दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : पंढरपूर वरून पंजाब राज्यातील घुमान येथे जाणाऱ्या श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र अलंकापुरीत उत्साहात स्वागत आळंदीकरांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, चैतन्य महाराज लोंढे, डि.डि.भोसले, संजय घुंडरे, रामदास भोसले, तुकाराम माने, अजित वडगावकर, अरुण घुंडरे, विठ्ठल शिंदे, जनार्दन पिताळे, संतोष कारंडे, संकेत वाघमारे, निसार सय्यद, राजेंद्रकुमार कापसे, शंकर टेमघिरे, मनोज मांढरे तसेच वारकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पुण्यनगरीतील मुक्काम करुन चरण पादुका रथ व सायकल वारी आल्यानंतर सायकलवीरांचे तसेच सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे यांचे व भजनकरी बांधवांचे भव्य स्वागत करण्यात आले. नगरपरिषद चौकातून येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.
या मिरवणुकीत विठ्ठल विठ्ठल विठ्ठला! या तालावर सायकलवीरांनी “पाऊली” या नृत्याचा आविष्कार सादर केला. पालखी सोहळा व सायकल वारीची मिरवणूक महाद्वार चौकात आल्यावर डोक्यावर संत नामदेवांच्या पादुका घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आगमन झाले. यावेळी देवस्थानच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायातील भक्त, आळंदीकर बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. पालखी सोहळा व सायकल वारी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला.
शांती, समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,३०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रेचा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. या सायकल यात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १०० सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला असल्याचे आयोजक सुर्यकांत भिसे व विलास काटे यांनी सांगितले.