चिमूर तालुक्यातील मौजा गोरवट येथील मतदार करणार मतदानावर बहिष्कार… — विविध मागण्यांचे चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… — प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याच्या भावना झाल्या संवेदनशील..

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

         चिमूर तालुक्यात अवैध रेती उत्खनन हा विषय गंभीर बनलेला आहे.पण,या विषयाकडे स्थानिक प्रशासन नेहमी दुर्लक्ष करीत असून अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्यां चोरांना अप्रत्यक्षपणे संरक्षण देत आहे.

         अवैध रेती उत्खननाबाबतचे संरक्षण मौजा गोरवट नागरिकांचे नैसर्गिक व स्वाभाविक असे आर्थिक नुकसान करणारे आहे.

          यामुळे या आणि इतर विषयाला अनुसरून मौजा गोरवट येथील मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे निवेदन तहसीलदार चिमूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले आहे.

       अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्यांना गाव विकासासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत हवी आहे व गोडाझरी/गोसीखुर्द चे पाणी शेतीसाठी आवश्यक आहे.

         याचबरोबर गावात स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने ती करुन देणे,विद्यार्थ्यांना व गाव नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने त्या अनुषंगाने तात्काळ अंमलबजावणी करणे,गावातील नाल्यांची व रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे व सांडपाण्याचा निचरा करणे, क्रिडा मैदानासाठी जागा उपलब्ध करून देणे,गावपातळीवर वादविवाद मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती तयार करणे,गावातील नागरिकांना वापर करण्यासाठी खाली जागा सुनिश्चित करुन देणे,अशा पध्दतीच्या मौजा गोरवट वासियांच्या मागण्या आहेत.

       वरील मागण्या मान्य न झाल्यास मौजा गोरवट येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

        प्रत्येक गावातील समस्या प्रशासनाने वेळेत निकाली काढल्या तर नागरिकांवर मतदान न करण्याची वेळ येणार नाही.

         याचबरोबर मतदान करणे हा मतदारांचा महत्त्वपूर्ण मुलभूत अधिकार आहे.हा अधिकार त्यांचे भविष्य ठरवतो आहे.

            चंद्रपूर जिल्हाधिकारी मौजा गोरवट वासियांच्या मागण्यांचे निवारण करतात की त्याकडे पाठ फिरवितात हे लवकरच स्पष्ट होईल.