कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा कारखान्याकडून रु. 200 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता बँकेत वर्ग…  — राजवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांची माहिती… 

बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

             इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सन 2023-24 साठी ऊस बिलाचा दिवाळीसाठी प्रति टन रु. 200 प्रमाणे हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज मंगळवारी (दि.22) वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी इंदापूर येथे मंगळवारी (दि.22) दिली.

       माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली हे दोन्ही कारखाने उत्कृष्टरित्या कार्यरत आहेत. या दोन्ही कारखान्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना रु. 2700 प्रमाणे ऊस बिलाची रक्कम वेळेवरती अदा केलेली आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ऊस बिलाचा दिपावलीसाठी रु. 200 प्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राजवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी दिली.

     तसेच या दोन्ही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिवाळीसाठी देण्यात येणार आहे. आगामी सन 2024-25 च्या गळीत हंगामासाठी दोन्ही कारखाने सज्ज झाले आहेत. आगामी गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.

  या दोन्ही कारखान्यांमध्ये कामगारांचे पगार नियमितपणे होत आहेत, मात्र गैरसमज निर्माण केला जातो, कारखान्याचे बदनामी केली जात आहे. कारखान्या संदर्भात चुकीच्या गोष्टी करू नका, या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, असे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले. याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक उपस्थित होते.

चौकट

विरोधक सहकारी संस्था का काढत नाहीत?-राजवर्धन पाटील 

विद्यमान लोकप्रतिनिधीकडे दुग्धविकास खाते होते, तरीही त्यांनी तालुक्यामध्ये दुध डेअरी का काढली नाही? 10 वर्षाच्या काळात त्यांनी सहकारी संस्था का निर्माण केल्या नाहीत? तसेच 10 वर्षात एकही शाळा-महाविद्यालय का काढले नाही? विद्यमान लोकप्रतिनिधी संचालक असलेल्या छत्रपती कारखान्याची 2 वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा का घेतली नाही? छत्रपती कारखान्याच्या सध्याच्या संचालक मंडळाला 10 वर्षे होत आली तरीही निवडणूक का घेत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरे विरोधक का देत नाहीत, असा सवाल राजवर्धन पाटील यांनी केला. इंदापूर तालुक्यात अनेक सहकारी संस्था निर्माण करून, त्याद्वारे रोजगार निर्माण करून, सतत येणाऱ्या विविध अडचणीवर मात करून संस्था यशस्वीपणे चालविण्यासाठी हिम्मत लागते, ती हिंमत फक्त हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांनी कष्ट घेऊन, सतत वेळ देऊन, त्रास सहन करून, जिद्दीने व मेहनतीने उभारलेल्या संस्थांवर राजकीय स्वार्थासाठी टीका करणे सोपे असते, असा टोला राजवर्धन पाटील यांनी विरोधकांना लागावला.

चौकट

कारखान्यांची बदनामी थांबवावी – लालासाहेब पवार 

कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भीमा कारखाने चांगल्या पद्धतीने चालत आहेत. ऊस बिले वेळेवर अदा केली आहेत. कर्मचाऱ्यांचे नियमित पगार होत आहेत. मात्र ज्यांना संस्था काढून रोजगार देण्याचे माहित नाही, तेच कर्मचाऱ्यांच्या पगारा संदर्भात गैरसमज पसरवत आहेत. या चांगल्या चालत असलेल्या दोन्ही संस्था आगामी काळात निश्चितपणे महाराष्ट्रात नावारूपास येतील, असा विश्वास यावेळी बोलताना निरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी व्यक्त केला.