ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यातील सर्व लोहखदानी रद्द करा या मागणीसाठी गेली अनेक वर्षे स्थानिक आदिवासींचा खदानविरोधी आंदोलन सुरू आहे. सातत्याने चाललेल्या या आंदोलनामुळे अनेक प्रस्तावित लोह खदानी शासनाने स्थगित केल्या.
मात्र बळजबरीने सुरु केलेल्या सुरजागड लोहखदानीचे काम सुरू झाल्याने झाल्याने आणखी काही भांडवलदार कंपन्या लोह खदानी खोदण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे दक्षिण गडचिरोली आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेचे जीवनमान संकटात सापडणार आहे.
ते होवू नये आणि दलालीबाज कार्यकर्त्यांचा शिरकाव होवून थंडावलेले खदानविरोधी आंदोलन पुन्हा तीव्र होण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने गडचिरोलीसह अहेरी विधानसभेत उमेदवार देण्याचे ठरविले असून शेकापच्या उमेदवारीमुळे सुरजागड व इतर बेकायदेशीर लोहखदानींचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, २०१७ मध्ये अशाच पध्दतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक खदानविरोधी मुद्यांवर लढवून खदानविरोधी कार्यकर्ते भरघोस मतांनी निवडून आले होते. अहेरी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात असलेले आजी – माजी सर्व संभाव्य उमेदवार प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष येथील लोहखदानीचे समर्थक असतांना शेतकरी कामगार पक्षाने खदानविरोधी आंदोलनाच्या मुळ मुद्यावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करताच सत्ताधारी आणि सत्ता विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शेतकरी कामगार पक्षातर्फे समविचारी पक्षांना घेवून प्रस्थापितांना शह देण्यासाठी सक्षम असलेला उमेदवार देण्यात येणार असून लोहखदानींशी संबंधीत विविध २५ मुद्यांवर निवडणूकीला सामोरे जाणार आहे. या सर्व मुद्यांचा पाठपुरावा निवडणूक आयोग आणि शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावाही करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी दिली आहे.