मलिदा गॅंग हटाव इंदापूर तालुका बचाव ची गरज :- अंकिता पाटील ठाकरे… — व्याहळी येथून अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ…

बाळासाहेब सुतार   

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

                  इंदापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांमध्ये बेरोजगार युवक, महिला यांच्या हाताला काम प्रयत्न झालेला नाही. तसेच दूरदृष्टीच्या नेतृत्वाअभावी तालुका हा सर्वांगीण विकासा कामांमध्ये पिछाडीवर गेला आहे. सध्या तालुक्यात फक्त मलिदा गँगच्या ठराविक लोकांचा विकास झाला आहे.

           त्यामुळे विकासाची निकृष्ट कामे करणारी मलिदा गॅंग हटवून इंदापूर तालुका बचावची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी व्याहळी (ता. इंदापूर) येथे जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी रविवारी (दि.13) केले.

        अंकिता पाटील ठाकरे यांच्या इंदापर तालुक्यातील जनसंवाद यात्रेचा शुभारंभ व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी मलिदा गॅंग हटाव इंदापूर बचाव चा नारा दिला. या जनसंवाद यात्रेमध्ये अंकिता पाटील ठाकरे तालुक्यातील जनतेशी गावोगावी संवाद साधणार आहे. 

             इंदापूर तालुक्यात 5500 कोटींच्या विकास झाला आहे असे सांगितले जाते, परंतु जनतेला तर विकास दिसत नाही, मग विकासाचा निधी गेला कुठे, असा सवाल करून अंकिता पाटील ठाकरे पुढे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील यांनी आणलेल्या लोणी देवकर येथील पंचतारांकित एमआयडीसी मध्ये आपणास नवीन उद्योगधंदे आणायचे आहेस.

            शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण आदि क्षेत्राच्या विकासासाठी आपणास काम करायचे आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी घेतला आहे. खा. सुप्रिया सुळे आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणेसाठी हर्षवर्धनभाऊ पाटील यांना साथ द्यावी, असे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी केले.

          यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आणणेसाठी व राष्ट्रीय नेते खा.शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे हात मजबूत करणेसाठी हर्षवर्धनभाऊ पाटील यांना विधानसभेत विकमी बहुमताने पाठवा, असे आवाहनही सागरबाबा मिसाळ यांनी भाषणात केले.

            प्रास्ताविक व्याहळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन डी. के. गोळे यांनी केले. यावेळी इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, अँड. आशुतोष भोसले, राजेंद्र पवार, पै. कांतीलाल जाधव, अतुल वाघमोडे, बबलू पठाण, विकास चितारे आदींनी मनोगते व्यक्त केली. या जनसंवाद यात्रा शुभारंभ कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार वाल्मिकी शिंदे यांनी मानले.

चौकट

 सर्व महापुरुषांच्या व शंकररावजी पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन!

          इंदापूर येथील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास व इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते, कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या पुतळ्यास अंकिता पाटील ठाकरे यांनी रविवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर परंपरेप्रमाणे व्याहळी येथील भैरवनाथ मंदिर येथे नारळ फोडून अंकिता पाटील ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केला.