डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती :- खोब्रागडे….   — गोकुळनगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

गडचिरोली – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती होती. या धम्मक्रांतीमुळे दलितांच्या जीवनात नव्या पर्वाची सुरुवात झाली आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. धम्मक्रांतीची हि पताका अधिक डौलाने फडकविण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ.प्रेमकुमार खोब्रागडें यांनी केले.   

    सम्यक समाज समिती, विशाखा महिला मंडळ व सम्यक ज्येष्ठ नागरिक समितीच्या संयुक्त विद्यमाने येथील गोकुळनगर येथील सम्यक बुद्ध विहाराचे प्रांगणात आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

   सम्यक समाज समितीचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, डॉ. खुशाल दुर्गे, माली समाज संघटनेचे हरिदास कोटरंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कवडूजी उंदीरवाडे, विशाखा महिला मंडळाच्या चंद्रकला टेम्भूर्णे प्रामुख्याने उपस्थित होते. 

           बाबासाहेबानी माणसाला माणुसकीची जाणीव करून दिली. त्यांच्यात स्वाभिमान जागृत करून बुद्धाचा नवा मार्ग दिला आणि मूकनायकाला प्रबुद्ध भारतात रूपांतरित केले . त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे आणि धम्माच्या या दिशेनेच मानवी समूहाचे कल्याण होणार आहे असेही डॉ. खोब्रागडे याप्रसंगी म्हणाले आणि धम्म प्रचाराचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन केले. 

           रोहिदास राऊत म्हणाले बुद्धाचा धम्म आज सर्व जगात पोहोचला आहे. धम्म मार्गाचे अनुसरण देश विदेशात केल्या जात आहे हि बौद्धांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती आज सर्व मानव जातीसाठी उपकारक झाली आहे. धम्मचक्र प्रवर्तन हे बाबासाहेबानी केलेले अलौकिक कार्य आहे आणि त्यामुळे दलितांच्या जीवनात झालेले परिवर्तन ही अत्यंत ऐतिहासिक बाब आहे.

           अन्य मान्यवर पाहुण्यांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम मेश्राम यांनी केले. संचालन नमिता वाघाडे यांनी तर आभार प्रदर्शनअश्विनी साखरे यांनी केले. कार्यक्रमाला बौद्ध बांधव व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   प्रारंभी पंचशील ध्वजारोहण तथा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमान वंदन करण्यात आले व बुद्ध वंदना घेण्यात आली.