लोकशाहीतील मताचा अधिकार आमच्या जिवापेक्षाही मोलाचा आहे…

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे आमच्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजनची क्षणोक्षणी आवशकता असते,त्याप्रमाणे लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी पाच वर्षातून एकदा संधी मिळणाऱ्या मताच्या अधिकाराची आवशकता असते….. 

          जरी ही संधी पाच वर्षातून एकदाच आपल्याला मिळत असली,तरी तीची ऊर्जा निरंतर जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजनच्या आवशक्तेपेक्षाही जास्त आवश्यक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला निःस्वार्थ आणि त्यागातून समर्पणाची आवशकता असते…

            कारण आमच्यावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुख आणि दुःख यांची निर्मिती ही लोकशाहीतून होत असते.सार्वजनिक सुख आणि दुःखात प्रत्येकजन वाटेकरी असतो.वैयक्तिक किंवा मर्यादित गटबाजीच्या सुख -दुःखात विशिष्ट जणांनाच त्याचा लाभ किंवा भोगावे लागते.या गटबाजीच्या ध्रुवीकरणातूनच लोकशाहीच्या आत्मघाताची सुरुवात होते.”

          आपल्या हृदयातील कल्पनाशक्तीच्या असलेल्या क्षितिजाच्या पलीकडे असणाऱ्या प्रतिभा शक्तीतून जी विवेक शक्ती सामूहिकदृष्ट्या जेवढी जागृत असते,तेवढी लोकशाही जिवंत आणि तेवत असते.

            परंतू,त्यासाठी लागणाऱ्या पोषक वातावरणाची, परिस्थितीची,सूसंस्कृतीची आवशकता असते.विवेकाला कायमचे मारून टाकून त्याची निर्मिती कधीही होऊ शकत नाही.त्यासाठी सुज्ञ जाणकाराने किंवा अशा सुशिक्षित पिढीने ही भारतीय समाजाची दशा ओळखून आपल्या विवेकी प्रतिभेचा उपयोग यासाठी करावा,तेही त्याग आणि समर्पण यातूनच.निदान काळाची पाऊले ओळखून तरी.तर काहीतरी आशा जिवंत राहतील.

          आज लोकशाहीचे चारही आधारस्तंभ कोसळण्याच्या अवस्थेत आलेले आहेत.याचे कारण आम्ही आमची सर्व प्रकारची आत्मविश्वासाची क्षमता नेत्त्यांकडे आणि पक्षांकडे गहाण टाकल्यामुळे.मृगाचीये अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा,त्यास नसे ठावा.अशी आमची परिस्थिती झालेली आहे.केवळ क्षुल्लक आणि फुटकळ स्वार्थासाठी आम्ही आमचा आत्मविश्वास गहाण ठेऊन विभूतीपूजेला जन्माला घालतो आणि आमच्याच हाताने आमच्याच पायावर दगड पाडून घेतो.हीच विभूतीपूजा लोकशाहीला संपवते,हेच आम्ही विसरून जातो..

            म्हणजे माझे स्वतःचे, इतरांचे,सर्व देशाचे,जगाचे,सर्वप्रकारचे दुःख नष्ट करण्याची क्षमता ज्या लोकशाहीत आहे.लोकशाही व्यतिरिक्त कोणत्याही शासन प्रणालीमध्ये रक्तपात थांबविण्याची किंवा तो नष्ट करण्याची शक्ती नाही.याचा अनुभव आपण वं जगाने पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या संहारातून अनुभवला.म्हणूनच तर युनोची निर्मिती होऊन आजपर्यंत अनेक देशात निदान लोकशाहीचे सांगाडे आहेत म्हणूनच तर तिसरे व अंतिम महायुद्ध लांबत आहे.

          एवढी अफाट शक्ती लोकशाहीत असतांना,आमचा खंडप्राय देश लोकशाहीवादी महापुरुषांनी निर्माण केलेला असतांना,ही लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी मार्गदर्शक तत्वाचा संच म्हणजे…..

      भारताचे संविधान असतांना सुद्धा केवळ 75 वर्षातच आम्ही त्या अविष्कारितेपासून जागृत न होता वंचित का?

         त्याचे एकमेव कारण,या सर्वांच्या मुळाशी असलेला,आपल्या मताचा अधिकार.जो पाच वर्षातून एकदाच आपल्याला मिळतो,आणि क्षुलक आणि फुटकळ स्वार्थासाठी,किंवा नेत्याच्या ढोंगी प्रेमापोटी,अनमोल हे आमच्या सर्वांगीण सुरक्षेचे हत्यार अलगद विकून मोकळे होऊन पुढील पाच वर्षाचे आम्ही यांचे गुलाम होतो..

         हीच गुलामी आम्हाला लोकशाही,संविधान आणि देशाला आत्मघताकडे घेऊन जाणारी आहे.असे कधीच होऊ नये,म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वरील संदेश आम्हाला ( भारतीय जनतेला ) दिलेला आहे की,लोकशाहीतील तुमच्या मताचा अधिकार तुमच्या जिवापेक्षाही!..

            जागृतीचा लेखक

              अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…