गांधीजींच्या विचारांची आज समाजाला गरज :- अजित वडगांवकर…. — श्री ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारानेच देशाने आणि जगाने पुढे जायला हवे. देशातील सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या विचारांची जास्त गरज असल्याचे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सांगितले.

          भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

        यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रकाश भागवत, सुदाम मोहरे, योगेश मठपती, अनुजायिनी राजहंस, शारदा साबळे, लता बिरदवडे, वैशाली शिर्के, उमेश कुलकर्णी, राजू सोनवणे, सावळाराम देशमुख आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         गांधीजी व शास्त्रीजी या फक्त व्यक्ती नव्हत्या तर तो एक विचार होता हे त्यांनी त्यांच्या कार्यातून नेहमी समाजाला दाखवून दिले. त्यांचे कार्य आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधीजींचा मोलाचा वाटा होता. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची जडणघडण होण्यामध्ये लालबहादूर शास्त्रीजींनी हातभार लावले असल्याचे वडगांवकर यांनी सांगितले.