“कायाकल्प पुरस्कार”योजनेत आळंदी ग्रामीण रुग्णालयाची बाजी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते. २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आळंदी ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे असणार आहे.

         नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. कायाकल्प पुरस्कार राज्य पातळीवरील असून त्यासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उर्मिला शिंदे आणि त्यांचे सहकारी अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांची सातत्याची मेहनत तसेच आरोग्य विषयक संख्यात्मक आणि गुणात्मक आरोग्य सेवा देण्याच्या प्रयत्नास मिळालेले हे यश आहे असे मत डॉ.उर्मिला शिंदे यांनी व्यक्त केले आहे. 

            उपसंचालक डॉ.राधा किशन पवार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ येमपल्ले याच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे हा पुरस्कार मिळू शकला असे शिंदे यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळालेले इतर रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय असून आळंदी हे ग्रामीण रुग्णालय असूनही या पुरस्कारात बाजी मारली आहे याचा आनंद असून आरोग्य सेवेचे पुढील काम करण्यासाठी हे प्रोत्साहन ठरेल असे डॉ.उर्मिला शिंदे यांनी सांगितले. आळंदी ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव पाखरे, इंद्रायणी सेवा फौंडेशनचे सचिव डॉ.सुनील वाघमारे, शिरीषकुमार कारेकर यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उर्मिला शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले.