शाळा व महाविद्यालय परिसरात शिस्त,कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्यासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिले निवेदन…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी इंदापूर येथे युवकाने गोळीबार केल्याने शैक्षणिक परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, श्री. नारायणदास रामदास हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, श्री. नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर व इंग्लिश मिडिअम स्कुल, येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना शिस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवेदन दिले आहे. झालेली दुर्घटना अतिशय गंभीर आहे.

            अशा घटनेने संपुर्ण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा घटना कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात.

           यामुळे शाळा महाविद्यालय परिसरात भितीचे वातावरण निर्माण होते. एस.टी.स्टँड परिसर ते महाविद्यालयाच्या गेटपर्यंत पार्किंग व्यवस्था अत्यंत अस्थाव्यस्त असते. काही मोकाट गैरवर्तन करणा-या युवकांचा या परिसरात मोठा वावर असतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या मोटारसायकल व इतर वाहनांचा वापर करुन गोंगाट तयार केला जातो.

            त्यामुळे मुलांना शिक्षण देण्यास व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा सतत प्रश्न निर्माण होतो. त्या कामी आपण योग्य ती कार्यवाही करुन महाविद्यालय व शाळा प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.

          यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे, इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका फौजीया शेख, मराठी माध्यम विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड , डाॅ शिवाजी वीर, डाॅ.भिमाजी भोर,डाॅ.सदाशिव उंबरदंड डाॅ.भरत भुजबळ व इतर दिडशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.