परिसंस्था,अन्न साखळीत छोट्यांचे काम मोठे :- डॉ.अंकुर पटवर्धन… — पुण्यनगरीत पर्यावरण व्याख्यानमालेस प्रारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणारी ‘जीविधा’ ही संस्था तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा बायोडायव्हर्सिटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण व्याख्यानमालेस २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रारंभ झाला. ‘आज पहिल्या दिवशी डॉ.अंकुर पटवर्धन यांच्या छोट्यांचे रंजक विश्व’ या विषयावरील व्याख्यानाने प्रारंभ झाला.

           ‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या विषयावरील ही व्याख्यानमाला दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान दृकश्राव्य सभागृह, गरवारे महाविद्यालय (कर्वे रस्ता) येथे रोज होत आहे.व्याख्यानमालेची वेळ रोज सायंकाळी ६.३० ते ८ अशी असणार आहे. व्याख्यानमालेचे १६ वे वर्ष असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.

          डॉ.अंकुर पटवर्धन यांनी व्याख्यानात कीटक, माशा, फळमाशा, झुरळ तसेच फुलपाखरांच्या योगदानाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘छोटे कीटक, प्राणी हे पाठीचा कणा नसलेले इनव्हर्टिब्रेट प्रकारात येतात. परागीकरणाचे काम कीटकांकडून होते. अन्न सुरक्षिततेसाठी हे महत्वाचे आहे. त्यात वैविध्य राखण्यासाठी कीटकांची भूमिका महत्वाची आहे. हे कीटक, माशा या परिसंस्थेचा पाया असतो. त्यांचे स्थान अनमोल आहे. कृषी उत्पादनाशी ते थेट संबंधित आहे. अर्थव्यवस्था आणि मानवी आरोग्याशी छोटे कीटक, माशा थेट संबंधित आहेत. ऑर्किडची फुले फुलणे आणि परागीकरण हेही तितकेच रंजक आहे. त्यातून एक अन्न साखळी दिसून येते.

         जमिनीखालील मुंग्यांमुळे काही बियांच्या रुजण्याच्या प्रक्रियेत मदत होते. कीटकांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या ८० टक्के बिया उगवणक्षमता बाळगून असतात. काही माशा, झुरळे परागीकरणात मदत करतात. फुलपाखरांविषयी देखील या व्याख्यानात माहिती देण्यात आली आली. ‘जीविधा’ संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी गरवारे महाविद्यालयाच्या बायोडायव्हर्सिटी विभागाचे प्रमुख डाॅ.अंकुर पटवर्धन यांचे स्वागत केले वृंदा पंडित यांनी प्रास्ताविक केले.

आगामी व्याख्याने 

         डॉ.प्रगती अभ्यंकर (सूक्ष्मजीवांचे विश्व), नूतन कर्णिक (सौंदर्य छोट्या किटकांचे), ईशान पहाडे (परागीकरणात किटकांची भूमिका), रजत जोशी( फुलपाखरे),सुधीर सावंत (सूक्ष्मांचे छायाचित्रीकरण) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

          निसर्ग साखळीत सर्व सजीव जातींचे महत्व एकसारखे असते. दुर्दैवाने लहान आकाराच्या सजीवांकडे सजगतेने पाहिले जात नाही.’जीविधा’ व गरवारे महाविद्यालयाच्या बायोडायव्हर्सिटी विभागतर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत छोट्या आकाराच्या जीवसृष्टीची माहिती तज्ज्ञांकडून ऐकण्याची संधी मिळेल.