आरमोरी येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ई-टॉयलेट लोकार्पण सोहळा संपन्न…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- आरमोरी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असताना, आता शहरात स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

         शहरात चार ठिकाणी ई-टॉयलेट चा आज, ११ सप्टेंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.

          शहरात पहिल्यांदाच आरमोरी नगरपरिषद यंत्रणेने ई-टॉयलेट उभारणीसाठी पुढाकार घेत आरमोरी शहराच्या नवीन बस स्थानक परिसर, आठवडी बाजार, शास्त्रीनगर शेगांव वार्ड क्रमांक-२ व अरसोडा या ठिकाणी ई-शौचालये उभारण्यात आली.

           मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही या ई-टॉयलेटची वैशिष्ट्ये आहेत. आरमोरीत प्रथमच अशी ई-टॉयलेट उभारण्यात आली आहेत. पे अँड यूजच्या धर्तीवर त्यांचा वापर केला जातो. नाणे टाकल्यानंतर प्रसाधनगृहाचा वापर करता येईल. या टॉयलेटसाठी ४५ चौरस फूट इतकी कमी जागा लागते. पाचशे लिटर पाणी त्यात साठविलेले असते तसेच एका वेळी दीड लिटर पाण्याचा वापर होतो. त्यामुळे ई-टॉयलेट स्वच्छ व यूजर फ्रेंडली असतात. पर्यावरणच्या दृष्टीने उपकारक ई-टॉयलेटचा दरवाजा उघडताच आतील दिवे आणि एक्झॉस्ट फॅन सुरू होऊन आपोआप पाणी फ्लश होते. बाहेर पडल्यावरही सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा संपूर्ण शौचालय स्वच्छ होते. या स्वयंचलित शौचालयात बेसीनदेखील आहे. ई-टॉयलेट ही संकल्पना तंत्रज्ञानावर आधारित आहे. स्वच्छ भारत अभियानादरम्यान शहर स्वच्छतेकडे हे एक पाऊल आहे; असे आमदार गजबे यांनी लोकार्पण सोहळा प्रसंगी सांगितले.

          या लोकार्पणाप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, आरमोरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ.माधुरी सलामे,भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी आरोग्य सभापती भारतभाऊ बावनथडे, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, भाजपा शहराध्यक्ष विलास पारधी, सोशल मीडिया संयोजक अमोल खेडकर, खेमराजभाऊ जांबुले, इंजी. राहुल तीतीरमारे, गोविंदा भोयर, मिथुन मडावी, सुरज कारकुरवार, शुभम निंबेकर, राजू जराते, नरेश ढोरे, हेमंत कोपुलवार, इंजि. कस्तुभ रोकमवार, अविनाश बंडावार, नितीन गौरखेडे, काटेखाये, राजू कांबळे, गिरीश बांते, अविनाश गाढवे, आरमोरी नगरपरिषदेचे कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.