ब्रम्हपूरी येथील कुणबी समाज महाअधिवेशनात खा.प्रतिभाताई धानोरकरांनी भविष्यातील निवडणुकांमध्ये “कुणबी कार्ड “चालविण्याचे आवाहन करून अल्पसंख्याक असूनही बहुसंख्यांकांना दावणीला बांधणाऱ्या राजकारण्यांना जोराची टाच दिलीअसेच म्हणता येईल.
अप्रत्यक्षपणे विजय वडेट्टीवारांना गारद करण्यासाठी ताईंचा हा वार होता की जिल्ह्यातील बहुसंख्य कुणबी समाजाची मोट बांधण्याचा हा त्याचा प्रामाणिक सूर होता हे भविष्यातील राजकीय घडामोडींवरून कळणार आहे.
मात्र या कुणबीकार्ड चालविण्याचे आवाहनातून किंबहुना या वक्तव्यातून खासदारांनी राजकीय धमाल उडवून दिली आहे हे निश्चित.
कारण आमदार, खासदार सहसा समाजविशेष वक्तव्यापासून दूरच राहतात. विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात जाऊन कुणबी समाजाच्या मोठ्या अधिवेशनात बहुसंख्येने असलेल्या मतदारांना ‘जातकुळी’ बघण्याचा महामंत्र देणाऱ्या खा.धानोरकर ताईंच्या हिमतीची दाद तर द्यावीच लागेल.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार हे ओ.बि.सी.नेते म्हणूनही ओळखले जातात. मात्र सकल कुणबी समाजाने येत्या निवडणुकांमध्ये ” ओ.बि.सी. फॅक्टर” मधून स्वत:ला बाहेर काढले तर मात्र वडेट्टीवार कंपू कमालीचा अस्वस्थ होऊ शकतो हे खा.धानोरकर मैडमनी चांगले हेरलेले दिसते.
खा.प्रतिभाताईंच्या या वक्तव्याला अराजकीय तरी कसे म्हणता येईल? कुणबी समाजातून संसदेत पोहचलेल्या नेत्यानी जिल्ह्यातील बहुसंख्येने असलेल्या आपल्या समाज बांधवांना राजकीय कानमंत्र देणे वावगे नसले तरी हा कानमंत्र अल्पसंख्याकातून पुढे आलेल्या नेत्यांसाठी इशाराच ठरतो.
मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा जपणारे विजयभाऊ वडेट्टीवार हा इशारा हलक्यात घेण्याची चूक करणारही नाहीत हे स्पष्ट आहे.
ना.विजयभाऊ व खा.प्रतिभाताई यांच्यात राजकीय झपटाझपटी लोकसभा निवडणुकीपासून टोकाला पोहोचल्याचे चित्र तसेही वारंवार बघायला मिळते. कांग्रेस अंतर्गत जिल्ह्याची धुरा सांभाळण्यावरून पुढेही या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चकमकी घडतच राहणार आहेत.
या आधीही माजी खासदार नरेशबाबू पुगलीया व विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यात जिल्ह्यातील नेतुत्वावरून मोठा कलगीतुरा जिल्हाने बघीतला होता.
असाच काहीसा प्रकार धानोरकर व वडेट्टीवार कंपनीमध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत शिगेला पोहचेल असे राजकीय विश्लेषक बोलताना दिसतात.
चंद्रपूर जिल्हा हा कुणबी बहूल क्षेत्र आहे. विजय वडेट्टीवारांचा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्र हा सुद्धा कुणबी बहूल मतदारांचा क्षेत्र आहे. वडेट्टीवार मात्र अल्पसंख्याक समाजातून आलेले नेते आहेत.
नेमका हाच धागा पकडून खा.धानोरकरांनी ब्रम्हपूरी येथील कुणबी महाअधिवेशनातून “कुणबी काडॅ” चा पत्ता तर खोलला नसेल अशीही चर्चा रंगत आहे. कुणबी
मतदारांनी कुणबी उमेदवार बघून मतदान करण्याचे खासदारांचे आवाहन बरेच काही सांगून जाणारे आहे. खासदारांनी कुणबी समाजाला आवाहन केल्यानंतर कुणबी समाजातून उमेदवारीसाठी सुद्धा अनेक इच्छुक पुढे आल्यास वडेट्टीवार कंपू ची डोकेदुखी सुद्धा वाढणार हे निश्चित.
पुढे कदाचित असे वक्तव्य न करण्याबाबत मॅडमला पक्षाकडून तंबी येऊ शकेल मात्र आता “कुणबी फॅक्टर” एक्टिव्ह झाला तर जिल्ह्यात अनेक प्रस्तापिताना राजकीय अस्तित्वासाठी मोठी धरपड करावी लागणार आहे हे नक्की.