रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/ वर्धा
मारेगाव :- पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण देशात ख्याती आहे.मात्र कष्टाने पिकविलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जवळपास चाळीस ते पन्नास टक्के कापूस तसाच त्यांच्या घरी ठेवलेला असून त्यांची आर्थिक देवाण घेवाण थांबली आहे.यामुळे कापसाला योग्य भाव न देता शेतकऱ्यांना शासनाने जाणिवपूर्वक हतबल करीत त्यांच्यात नैराश्य निर्माण केले आहे काय?याची चौकशी कोण करणार?
निसर्गाने यंदा पुर्णपणे पाठ फिरवली.त्यातच यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी होता.मात्र, महाराष्ट्र शासनाने कापसाला योग्य भाव न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असल्याचे वास्तव आहे.
कापसाला भाव नसल्याने शेतकर्यांच्या घरात कापसाचे ढिग जसेच्या तसे पडून आहेत.योग्य भावा अभावी
बळीराजा चांगलाच चिंतेत असून हतबल झाला असल्याचे पुढे आले आहे.
कापसाचे भाव अपेक्षे पेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.मागल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला होता या आशेने शेतकऱ्यांनी आपला कापूस घरी ठेवला असून मे महिना आला तरी भाव वाढण्या ऐवजी दिवसेंदिवस भाव कमी होत आहे.यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुध्दा भयंकर अळचणीचा सामना करावा लागतो आहे.
आज ना उद्या भाववाढ होईल या अपेक्षेने शेतकरी कपाशीची विक्री करीत नसल्याचे वास्तव कोणत्याही राजकीय नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना का म्हणून कळत नाही? आणि शेतकऱ्यांचे हित जपू न शकणारे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते एवढे अल्पज्ञानी आहेत काय? यावर आता लोक चर्चा होताना दिसत आहे.
पावसाने खरीप पिकांसह कपाशीचे नुकसान केले आहे,याचबरोबर आवरती दरम्यान कापसाची दरवाढ होते,हे गणित शेतकऱ्यांसमोर होते.
मात्र मार्च गेला,एप्रिल गेला,काही दिवसांनी जिनिग बंद होईल,मग भाव कधी वाढणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अजूनही यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाही.तालुक्यातील बँका मध्ये शेतकरी बांधव चकरा मारत आहे.अशी दैनवस्था शेतकऱ्यांची होऊन आहे.
दरवर्षी शेतीचे बजट शेतातील उत्पन्नावर असतात. तसेच गणित या वर्षीही शेतकरी बांधवांनी लावले आहे.परंतु कापसाच्या कमी भावामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.शेतकरी म्हणतात कोणताही पुढारी कापासाबाबत अधिवेशनात बोलला नाही.ही खंत अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
वर्षभर काबाडकष्ट करून पिकविलेल्या पिकांना मातीमोल भावात विकायचे हा कुठला न्याय आहे साहेब? असे शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
आता हंगाम तोडवर आहे.अजूनही अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरी ठेवून आहे. मात्र शेतकऱ्यांचा नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेची आर्त हाक ऐकाला जावू नये ही एक शोकांतिका आहे.
कापूस घरी ठेवला तर आजाराचा धोका.
जास्त दिवसापासून कापूस घरात असल्याने शेतकऱ्यांना त्वचारोग होत आहेत.कापसाचे भाव वाढतील या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी अजूनही आपला संपूर्ण कापूस विकलेला नाही. अनेक दिवसांपासून कापूस घरात ठेवून असल्याने आता या कापसावर डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळेच त्वचारोगासारख्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
शेतकऱ्याचे अर्थचक्र बिघडले.
महागडे बियाणे, रासायनिक खते,आंतरमशागती, मजूर व महागडी सुक्ष्म अन्न द्रव्ये,किटकनाशकांची फवारणी, कापूस वेचणीचा खर्च असे मिळून या शेतकर्यांना क्विंटलमागे किमान 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. सात हजार ते साडे सात हजार रुपये कापसाला भाव परवडत नाही.
या उत्पादन खर्चाची बेरीज कापूस हमी भावातून येणार्या उत्पन्नातून वजा करता येणे शेतकर्यांना शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले असल्याने शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचे पालनपोषण,मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कशी पार पाडायची हा ज्वलंत प्रश्न त्यांचे मन शून्य करतो आहे.
शेतकऱ्यांना रडवून किती रडवणार?व हतबल करुन किती करणार?
याचे उत्तर म्हणजे सत्ताधाऱ्यांची शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता आहे हेच म्हणावे लागेल!