चंद्रपूर मनपा तर्फे क्षयरोगमुक्तीसाठी प्रौढ बिसीजी लसीकरणाची सुरुवात…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

           चंद्रपूर ०४ सप्टेंबर – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी लहान मुलांना दिली जाणारी बीसीजी लस प्रौढ व्यक्तींना देखील देण्यात येणार असुन या बीसीजी लसीकरण मोहिमेची सुरुवात चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना लस टोचणी करून करण्यात आली.  

          मंगळवार ३ सप्टेंबर रोजी रामनगर येथील मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेची सुरवात करण्यात आली असुन याप्रसंगी पहिल्या लाभार्थ्याला लस दिल्यानंतर त्यांचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.

          राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६ निकषांमध्ये बसणाऱ्या १८ वर्षावरील प्रौढ व्यक्तींना बीसीजी लस देण्यात येणार आहे.

          या मोहिमेत चंद्रपुर शहरातील अतिजोखमीच्या गटातील लस घेण्यासाठी संमती दिलेल्या व टीबी – वीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या २० हजार ३०८ प्रौढ व्यक्तीचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिली.    

           राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाय योजना सुरू आहेत यात क्षयरुग्णांचे निदान, उपचार, पाठपुरावा करणे, निक्षय पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये क्षयरुग्णांना दिले जात आहे. याबरोबरच आता लसीकरण मोहिमेची सुरुवातही करण्यात आली आहे. 

             चंद्रपूर मनपा आरोग्य विभागांतर्गत २० हजार ३०८ वर्षावरील प्रौढ व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यात बीसीजी लसीकरणाची विशेष मोहीम महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांद्वारे ३१८ लसीकरण सत्रांचे आयोजन करून राबविण्यात येत आहे. हे लसिकरण सत्र महिनाभर चालणार असुन बीसीजी लस ही लहान मुलांप्रमाणेच प्रौढ व्यक्तींसाठीही उपयुक्त व सुरक्षित असल्याने शहर क्षयमुक्त होण्यासाठी नागरिकांनी बीसीजी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

              याप्रसंगी अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,डॉ.अश्विनी भारत, जिल्हा क्षयरोग अधिकारी,डॉ. ललित पटले आदी उपस्थित होते.

 लस कुणी घ्यावी 

 पूर्वी टीबीचा उपचार घेतलेले ( मागील ५ वर्षापूर्वीचे ) क्षयरुग्ण.

 क्षयरुग्णांच्या सहवासातील/ संपर्कातील व्यक्ती.

 ६० वर्ष वय पूर्ण असलेले जेष्ठ नागरिक/व्यक्ती व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक.

 मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेल्या वक्ती.

 धूम्रपान पूर्व इतिहास असलेले व धूम्रपान करणारे स्वयंघोषित व्यक्ती.

ज्यांचा बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे.

 लस कुणी घेऊ नये 

 १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती.

ज्यांनी बीसीजी लस घेण्यासाठी संमती दिलेली नाही.

 इम्युनोडेफिशियन्सी किंवा इम्युनोसप्रेसिव्ह औषधे घेत नसलेली व्यक्ती.

उदा.

अवयव प्रत्यारोपण झालेली व्यक्ती.      

 गरोदर माता /स्तनदा माता.

 एचआयव्ही बाधित व्यक्ती.

गेल्या ३ महिन्यात रक्त संक्रमणाचा इतिहास असलेल्या व्यक्ती.

ज्या वक्तींना एचआयव्ही संसर्ग होण्याचा ज्यास्त धोका आहे.

 बीसीजी किंवा इतर प्रचलित लसीचा गंभीर दुष्परिणामचा इतिहास.

 सध्या आजारी / गंभीर आजारी /कोणत्याही कारणाने अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती.