निर्लज्जपणाचा कळस म्हणजे केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी‌…

               आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता हार्ट अटॅक येऊन वारला असं कधी झालेच नाही…..

       कारण अटॅक येण्यासाठी सुद्धा हर्टची आवश्यकता असते…..!

          कारण,साम,दाम,दंड आणि भेदावर आधारलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे मेंदू कूटनितीने ठासून भरलेले असल्यामुळे सदसदविवेक बुद्धी कायमची मेलेली असते.केवळ चेहऱ्यावरील दिखाऊ आरसा हा विवेकाचा असतो तर,मेंदू मात्र कुटनीतीचा असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला भुलविण्याची यांची मिजास वाढत जाते.त्यामुळे यांना जनतेच्या दुःखाशी, त्यांच्या हालअपेष्टांशी काहीही घेणे देणे नसते….!

        आज आमचे राज्य व देशातील बालिका, विद्यार्थिनी, महिला अशा ठिकाणी सुरक्षित नाहीत,जिथे स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुतेचे धडे एका आदर्शवान शिक्षकांकडून मिळतात.जिथे कुंपणच पीक खात असेल तर न्याय कुणाकडे न्यावा….?

       अशा घटनांनंतर एक दिवस आम्ही ( जनता ) रास्ता रोखू,आंदोलने करू,कॅण्डल मार्च काढू,निदर्शने करू….

    पण पुढे काय…?

हा प्रश्नच पुन्हा निरुत्तरीत राहतो…

         ही प्रवृतीच कायमची घालविण्यासाठी जनतेलाच पुढाकार घ्यावा लागेल.अन्याय सहन करण्याच्या काही मर्यादा असतात.जे राजकीय पक्ष व राजकीय नेते अशा प्रवृतीला पाठीशी घालतात,त्यांनाच आता जनतेने वठणीवर आणण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.एक उदाहरण जरी देशात घडले.तरी यांच्यावर वचक बसल्याशिवाय राहणार नाही.कारण स्लॅब किंवा छत पावसाळ्यात गळत असेल तर,खालून ताट,वाट्या लावून उपयोग नाही,तर वरूनच त्याचे वाटरप्रूफिंग करावे लागते.

       त्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गानेच जनतेच्या छोट्या छोट्या ” स्थानिक नागरी समित्याद्वारे ” हे शक्य आहे.

         स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,शहरातील नगरसेवक,महापौर,स्थानिक आमदार,खासदार या सर्व प्रकारच्या लोकप्रतिनिधीना या नागरी कृती समितीद्वारे त्यांच्या घरी,संपर्क कार्यालयात जाऊन या अन्याय अत्याचाराविरोधात जाब विचारणे,प्रसंगी त्यांना सोबत घेऊन पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रिया राबविण्यासाठी सुद्धा प्रयत्न या समित्याद्वारे केले पाहिजे.

     हा एक पर्याय झाला.असे अनेक पर्याय प्रत्येक नागरिकांच्या हृदयातून बाहेर येऊ शकतात,जेंव्हा याद्वारे आणि यासाठी अनेक लोकं एकत्र येतील तेंव्हाच….. 

       केवळ मतदान विरोधात करणे हाच एकमेव पर्याय असं नव्हे.हा उपाय केवळ आपल्या हातात 5 वर्षातून एकदाच येतो. आणि मग पुन्हा पाच वर्षे आम्ही नाम्या गेला आणि गोम्या आला म्हणून याचा अन्याय सहन करायचा का…?

       त्यासाठी,या विषयावर गंभीरतेने विचार करून जनतेनेच राजकारण आणि जात धर्म बाजूला ठेऊन अशा प्रकारच्या कृती समितीद्वारे अशा राजकारण्यांच्या बळावर घडणाऱ्या अन्याय अत्त्याचाराला रोखू शकू.तेंव्हाच लोकशाहीतील विभूतीपूजा नष्ट होण्यास सुरुवात होईल…

            जागृतीचा लेखक

              अनंत केरबाजी भवरे

  संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…