डॉक्टर्स कॉलनी मधील अस्वच्छते विरोधात डॉक्टरांनीच सुरू केले आमरण उपोषण.  — पालिका प्रशासनाने मागणी मंजूर करत स्वच्छतेचे दिले आश्वासन..

 युवराज डोंगरे 

उपसंपादक/खल्लार

      दर्यापुरातील तहसील रस्त्यालगत असलेल्या डॉक्टर्स कॉलनी मध्ये गेल्या अनेक दिवसापासून रुग्णालयांमधली घाण तथा पावसाचे पाणी व रुग्णालयातले पाणी आदी साचलेल्या अवस्थेत आहे.

       या संबंधात प्रशासनाला अनेक वेळा विनंती केल्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने परिसरात दुर्गंधी सह डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

        यासह रोगराईचा प्रकोपही वाढताना दिसत आहे.विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घाण साचलेली आहे त्या परिसरात रुग्णालये सुद्धा आहेत.साथीचे आजार पसरवणारे हे घाण पाणी तातडीने निर्मूलन करावे या मागणीसाठी नागरिक हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून डॉ.शरद पाटील गावंडे यांनी उपोषण सुरू केले आहे.

        त्यांच्या उपोषणाला दर्यापुरातील वैद्यकीय संघटनेने सुद्धा पाठिंबा दर्शवत उपोषणामध्ये सहभाग नोंदवला आहे.यासह सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रुग्णालयांच्या आसपासची स्वच्छता व्हावी यासाठी आंदोलनात सहभाग दर्शवला आहे.

        सदर मागणीची दखल दर्यापूर नगरपालिका प्रशासनाने घेतली असून आंदोलन स्थळाला प्रशासकीय अधिकारी यांच्यासह नगरपालिकेतील अभियंता यांनी ही समस्या मार्गी लावण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत या परिसरात जमा झालेले घाण,पाणी तातडीने इतरत्र काढून देण्याची ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

          यावेळी उपोषण स्थळी डॉ. सुनील चव्हाण,ऍड.संतोष कोल्हे, डॉ.शरद गावंडे,डॉ.सचिन नागे,डॉ.तिरुपती राठोड,डॉ.रवींद्र चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते पंकज आणसाने,भीमराव कुऱ्हाडे,सुधीर मिसाळे,गजानन साखरे,विनोद सोनावणे,गजानन सूर्यवंशी,गणेश वानखेडे,प्रभाकर पवार,डॉ.प्रकाश तायडे व वैद्यकीय संघटना आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना यांच्यासह नागरिक हक्क संरक्षण समिती दर्यापूर चे पदाधिकारी उपस्थित होते.

        अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासानुसार उपोषण मागे घेण्यात आले आहे.