आज साहित्यसम्राट अण्णाभाऊ यांची साठे जयंती आहे..अण्णाभाऊ म्हणजे साहित्यविश्वातील एक मोठे नाव.प्रथम त्यांना विनम्र अभिवादन!
साहित्य म्हणजे मनोरंजन, काल्पनिक,भावनिक, वर्णनात्मक, काव्यात्मक लिखाण होय. पण ते कस असाव? त्यातून वाचकांनी काय घ्यावे, हे महत्त्वाचे असते. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या साहित्यातून दुःख, दारिद्रयात खितपत पडलेल्या मानसाला नवचैतन्य मिळाले आहे. त्यातून अन्याया विरुद्ध लढणारे क्रांतीकारक उभे राहिले आहेत. त्यांचे साहित्य मानसांच्या जीवंतपणाच साक्षात वर्णन आहे. ते काल्पनिक किंवा भावनिक नाही. त्यांनी शाहिरी, काव्य,लावणी, गीत आणि म्हणणी हे प्रकार तमाशा आणि लोकनाट्यातून वापरले.ते समाजमनाला दिशादर्शक ठरलेले आहेत.त्याचाच येथे थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत.
अण्णाभाऊंनी आपल्या प्रबोधनाचा प्रसार हा समाजाच्या शेवटच्या घटकांपासून केला.गावखेड्यात जावून त्यांनी प्रबोधन केले. त्याकाळी ग्रामीण भागात गावपातळीवर तमाशा आणि लोकनाट्य हे मनोरंजनांचे महत्त्वाचे साधन होते. लहानपणापासून मोठ्यापर्यंत याचे सर्वाना आकर्षण होते. तमाशा असो की लोकनाट्य यामध्ये गण,लावणी,म्हणणी हे लोकनाट्य सुरु होण्यापूर्वी सादर व्हायचे.
गण हा प्रकार लोकनाट्याची सुरुवात असे. ही पारंपरिक पध्दत होती. यातून देवीदेवतांना नमन आणि वंदन करून आशीर्वाद मागण्याची एक पध्दत होती. ही पारंपारिक पध्दत अण्णांनी स्वीकारली होती.पण तिचे स्वरूप त्यांनी बदलले होते.त्यांनी यातून देवदेवतांना वंदन करण्याऐवजी मातृभूमी, देशभक्त, हुतात्मे,राष्ट्रवीर यांना वंदन करून आशीर्वाद मागितला आहे.
उदा.
प्रथम मायभूमीच्या चरणा।
छत्रपती शिवबा चरणा।
स्मरोनी गातो कवना।।
क्रांतिकारी वीरांना,आणि त्यागी भूषणा पणा लिवूनिया प्राणा।अर्पियले ज्यांनी जीवना।।
आठवून मनी शुभनामे करुनीया स्तवना।
आशीर्वाद मागतो आम्ही
कवना सभापती आणि रसिकांना स्फूर्ती द्यावी हिच प्रार्थना।।
यातून अण्णाभाऊ त्याकाळी विज्ञानवाद जपत होते, हे दिसून येते.
पुढे त्यांनी ‘म्हणणी’हा एक काव्यप्रकार वापरला. यामध्ये लोकनाट्यातील जे कथानक असे. त्याविषयी थोडक्यात काव्यस्वरूपात ते प्रेक्षकांच्या समोर मांडणी करत असत. जेणेकरुन प्रेक्षकांना ते कथानक सहजपणे समजून जाईल.
उदा.
‘अकलेची गोष्ट’ यातील ही एक ‘म्हणणी’ आहे.
खानदेशामध्ये गाव राजूरी खेडे एक लहान
त्या गावाची गोष्ट सांगतो घ्यावी ऐकून।।
एक सरकार दुसरा गवळी असे दोघेजन
मित्र जीवाभावाचे नांदत होते आनंदान।।
करती काळा बाजार दोघांचे नफ्यावर ध्यान
स्वार्थासाठी शेतकऱ्यांची मुरगाळती मान।।
एवढेच नाही तर त्यांनी केलेल्या गीत रचना ह्याही तेवढ्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात.
अण्णाभाऊंच्या प्रत्येक साहित्य कृतीतून वाचकांना एक उपदेश मिळताना दिसतो. दडपशाही, व्यापारशाही, सावकारशाही यावर ताशेरे ओढणारे हे काव्य आहे.म्हणजेच त्यांच्या काव्यातून वस्तुस्थितीचे दर्शन होताना दिसते.
लावणी हा पारंपरिक प्रकारही त्यांनी हाताळला. पण त्याच्या मुळ स्वरुपाला हात न लावता त्यालाही त्यांनी बदलत्या स्वरूपाचे रुप दिले.लावणी म्हणजे आपल्यासमोर प्रेम, श्रंगारीक, विरह उभा राहतो. पण याही पलिकडे जावून त्यातून समाजाचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. आणि समाजाला जागृत केले.
त्यामध्ये त्यांची सुगी, मुंबईची लावणी, माझी मैना गावावर राहिली,कथा मुंबईची ह्या लावण्यांनी प्रसिद्धी मिळवीली.
त्यांची प्रसिद्ध लावणी..
माझी मैना गावाकडे राहली
माझ्या जीवाची होतीया काहिली।
गरिबीने ताटतूट केली आम्हा दोघांची।
झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची।
वेळ होती भल्या पहाटेची।बांधाबांध झाली
भाकरतुकड्याची।घालवित निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची।गावदरीला येताचकळु कोमेजली तिच्या मनाची।
यावरून नक्कीच गरिबीच चित्रण अण्णांनी आपल्या लावणीमधून मांडलेले दिसते.
याबरोबरच त्यांनी विविध गिते रचनाबध्द केली आहेत. एकजुटीचा नेता, महाराष्ट्र देशा आमुचा, तू मराठमोळा, महाराष्ट्रावरुन टाक ओवाळून, बोलतं कड कपारी, पूर्वेला जाग आली, रवी आला लावून तूरा, शिवारी चला, तेलाशिवाय जळतो दिवा,भाग्याची माऊली आणि दुनियेची दौलत सारी इत्यादी प्रबोधनकारी गिते लिहली.
ते शेतकऱ्यांना प्रेरणा देतांना म्हणतात,
तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून
उद्या पिकल सोन्याचं रान
चल उचल हत्यार,गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण.
भाग्य लिहलेल माझ तुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्न लपलेल माझ तुझ
इथ दरड माळावरी
घेवून कुदळ खोरं,चला जावू म्होरं
देवू देशाला जीवन दान
चल उचल हत्यार..
अण्णाभाऊ म्हणायचे हे जगच श्रमिकांच्या हातावर आहे. हे विश्व जणू श्रमिकांच्या घामाच्या धारांनी श्रंगारीत केलय. शेतकरी,कामगार हे येथील महत्त्वाचे आहेत.हेच त्यांना अभिप्रेत होते.
अण्णाभाऊची शाहीरीने अन्यायाविरुद्ध दंड थोपटले होते. त्यांच्या शाहीरीमध्ये एवढी ताकत होती की त्यांचा एखादा पोवाडा ऐकला तर त्यातून क्रांतीची बीजे उगवायची. क्रांतिकारक तयार व्हायचे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णांनी पूर्ण महाराष्ट्र आपल्या शाहीरीतून लोकांना जागृत केले होते.त्यांची शाहीरी मनोरंजनासाठी नव्हती तर अन्यायाला तोंड देणारी होती. त्यांचे पोवाडे बघितले तर आपणास लक्षात येईल.
पोवाडे
स्पेनचा पोवाडा सन १९३६, नानकिंग नगरापुढे सन १९४२, स्टालिनग्राडचा पोवाडा सन १९४२, बंगालची हाक सन १९४४, पंजाब दिल्लीचा दंगा सन १९४७, महाराष्ट्राची परंपरा सन १९४७, मुंबईचा कामगार सन १९४९, बर्लिनचा पोवाडा सन १९४६, तेलंगणाचा संग्राम सन१९४७,अमळनेरचे अमर हुतात्मे सन१९४७ आणि काळ्या बाजाराचा पोवाडा सन १९४९.
या पोवाड्याविषयी काही पोवाडे उपलब्ध नाहीत. त्यामध्ये स्पेनचा पोवाडा हा पहिला मानल्या जातो.त्याचा कार्यकाल १९४६-३७ असावा असे मानले जाते. तर काही संशोधकाच्या मते नानकिंग नगरापुढे हा पोवाडा पहिला मानल्या जातो. त्यात काँ.डांगे यांचेही मत तेच सांगते. तोही उपलब्ध नाही. हा पोवाडा चीनमध्ये मार्क्सवादी फौजासशस्त्र उठाव करीत होत्या.त्या विजयाबद्दल हा ‘नानकिंग नगरापुढे’ अण्णाभाऊंनी पोवाड्याची रचना केली आहे. यामध्ये चीनमधील शुर सैनिकांच्या लढ्याचा तपशील देवून त्यांच्या यशाचे गौरवगीत पोवाड्यातून गाईले आहे.
स्टालिनग्राडचा पोवाडा-हा पोवाडा सात चौक आहे.या पोवाड्यामुळेच अण्णाभाऊ कम्युनिस्ट वर्तुळात लोकप्रिय बनले.
तेलंगणाचा संग्राम-तेलंगणातील कष्टकरी जनतेने हैदराबादच्या निजामाच्या सत्तेविरुद्ध दिलेला लढा हा या पोवाड्यातून अविष्कृत केला आहे.येथील जनतेने या लढ्यास साथ देण्याचे आवाहन या पोवाड्यातून केले आहे.
अमळनेरचे अमर हुतात्मे-हा पोवाडा चार चौकी आहे. अमळनेर येथे झालेल्या हत्याकांडाचे प्रभावी वीर रसाने या पोवाड्यात वर्णन केले आहे.अमळनेरच्या मिलमधील ‘शेख नथुलाल’या लढाऊ कामगारास कामावरून कमी केले होते. या वेळेस कामगारांनी मालकास एक खलिता पाठविला आणि जाब विचारला. यातूनच मालक आणि कामगार यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. त्यावेळी लोकांना लढण्यास बळ देणारा हा पोवाडा होय.
मुंबई गिरणी कामगार- यामध्ये मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाचे वर्णन अतिशय भेदकरित्या पोवाड्यातून केले आहे. हा पोवाडा १९०८ ते १४ ऑगस्ट च्या कामगारांच्या लढ्याचा ज्वलंत इतिहास आहे. हा १९२८ साली मुंबईतील ८४ गिरण्या बंद पाडणारा ऐतिहासिक संप झाला.हा संप जवळजवळ सहा महिने सुरू होता.याचा सरकारला राग आला. तेव्हा त्यांनी दडपशाहीचे धोरण सुरू केले. यामुळे कामगार पुन्हा खवळले.या संपाचे नेतृत्व काँ.डांगे,मिरजकर आणि बेंडले यांनी केले.
काळ्या बाजाराचा पोवाडा – अण्णाभाऊंनी या पोवाड्यात व्यापारी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून काळ्या बाजारात कशा विकतात तसेच नोकरशाही आणि राज्ययंत्रणा या काळ्या बाजाराला पोषक बनविण्यासाठी कसे प्रयत्न करतात, याचे उपहासगर्भ दर्शन या पोवाड्यातून करताना दिसतात.सोबतच हया दडपशाही आणि व्यापारशाही यातून गरिब बिचारी जनता भरडली न जाता कशी सहीसलामत मुक्त होईल त्याचा संदेश दिला आहे.
ह्यावरुन अण्णाभाऊंच्या प्रबोधनकारी लेखनाचा आपणास अंदाज येतो. त्यांनाच ‘साहित्य सम्राट’ का म्हणावे, याचे उत्तर यातच मिळून जाते.कारण त्यांचे साहित्य हे कल्पनाविलास नव्हते.ते वास्तव प्रसंगानुरुप लिहलेले आणि कृतीत उतरणारे होते. ते एक फक्त साहित्यिकच नव्हते तर ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते.
अण्णाभाऊंचे साहित्य त्याकाळी जेवढे महत्त्वाचे मानले जायचे,ते तेवढेच आज वर्तमानात लागू पडणारे आहे. आजही कामगारांची स्थिती योग्य नाही.आजही ते दडपशाहीत जीवन जगतात. कायद्यानेही त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार हाही बोकाळलेला आम्ही पाहतो आहोतच. म्हणून मुंबईकामगारांचा पोवाडा आणि काळ्या बाजाराचा पोवाडा युवा पीढींना जागे करतो.
अण्णांनी थोर महात्मे विचारवंत आपले आदर्श मानले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांनी आपल्या लोकगीते आणि कथेतून पेरण्याचा प्रयत्न केला आहे.अण्णा भाऊंनी आपली फकिरा ही कादंबरी त्यांना अर्पण केली आहे.
त्यांच्यामते संविधानाने आपणास स्वातंत्र्य,समता, बंधुता,न्याय दिलेला आहे.
म्हणून आम्ही आमचे हक्क अधिकार मिळविले पाहिजे.जणू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जबाबदारी आपल्यावर टाकली आहे.ती आपण स्वीकारली पाहिजे,आणि सर्वांनी एकजुटीने आपला विकास,राष्ट्रविकास घडवून आणला पाहिजे.
म्हणून ते म्हणतात,
जग बदल घालुनी घाव,सांगून गेले आम्हा भीमराव।
गुलामगिरीच्या या चिखलात,रुतून बसला का ऐरावत
अंग झाडुनी निघ बाहेरी,घे बिनीवरी धाव..।सांगून गेले..
एकजुटीने या रथावरती, आरुढ होवूनी चल बा पुढती
वर्ण,वर्ग,वर्चस्व भेदूनी,राख भीमाचे नाव..सांगून गेले।।
आज दिनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी आम्ही संकल्प केला पाहिजे.अण्णाभाऊंचे साहित्य वाचून त्यांना समजून घेवून त्यांनी दिलेला विचार वाढविला पाहिजे.एकीचा नारा सोबत घेवून यशाच्या वाटेने गतिमान झाले पाहिजे.
हिच अण्णाभाऊंना आदरांजली होईल.
बाबुराव पाईकराव
डोंगरकडा
९६६५७११५१४