पुरात वाहून गेलेल्या नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या जिगरबाजांची दखल… — वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने जाहीर केला शहिद बालाजी रायपुरकर वीरता पुरस्कार… 

       रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- आपल्या जीवाची पर्वा न करता पुरात वाहून गेलेल्या नागरिकांना वाचविणाऱ्या सुभाष डहारे आणि बाळू झोडे यांना वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने त्यांच्या जिगरबाज कार्यासाठी शहिद बालाजी रायपुरकर वीरता पुरस्कार जाहीर केला आहे. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि १००० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

            मागील आठवड्यात चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पुराचे स्वरूप आले होते.या पुरामुळे अनेक नागरिक पुरात अडकले होते.नेरी सिरपूर मार्गावरील नाल्यावर असलेल्या पुलाच्या पाण्याची तीव्रता लक्षात न आल्याने चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी असलेले पिंटू बरडे आणि केशव श्रीरामे पाण्याच्या प्रवाहात मोटारसायकलसह वाहून गेले.

           जीव वाचवण्यासाठी दोघेही टाहो फोडत होते. पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने अनेकांची हिम्मत झाली नाही.अशात सुभाष डहारे आणि बाळू झोडे या दोघांनी मोठया हिंमतीने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुरात वाहून गेलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.सुभाष डहारे आणि बाळू झोडे या दोन जिगरबाज व्यक्तींच्या हिंमतीमुळे त्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले.

           माणुसकीला जपत सुभाष डहारे आणि बाळू झोडे यांनी केलेल्या कार्याला सलाम करण्यासाठी वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने चिमूर क्रांतीभूमितील या दोन्ही विरांना शहिद बालाजी रायपुरकर वीरता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील यांनी कळविले आहे.एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.