जेतवन बुद्ध विहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन…

      रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :-

         तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 18 जुलै 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

         लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला रेखाताई बावणे,शकुंतलाताई चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

          याप्रसंगी बौध्द पंच कमेटी, मालेवाडा चे अध्यक्ष आयु. जगदीश रामटेके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.

         आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. अशा शब्दात मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

            यावेळी हिरालाल बहादुरे,कुसुमताई गजभिये,शितलताई बहादुरे, आयुशा,चौधरीताई व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मेश्राम यांनी केले व आभार योगेश मेश्राम यांनी मानले.