“जल्हादांना”पाठबळ देणारी मंडळी आली चर्चेत?.. पोस्टमार्टम..  प्रा. महेश पानसे…

              दि.१७.०७.२०२४ ला गडचिरोली ते मुल महामार्गावर मूल शहरापासून तिन,चार कि.मी.अंतरावर असलेल्या आकापुर गावाजवळच्या टर्निंगवर जनावरे घेऊन जाताना १६ चाकी वाहनाचा (ट्रक) क्र.CG-07-CB-0717 उलटून अपघात झाला. या अपघातात वाहनातील जनावरांचा दुदैवाने मृत्यू झाला आहे. उशिरा १७ जनावर यात मरण पावल्याची नोंद पोलीस दरबारी झाल्याचे कळते.

           नेहमीप्रमाणे आरोपी फरार झालेत.सदर जनावरे कत्तलीकरीता तेलंगानातील हैदराबाद नेण्यात येत होते हे नव्याने सांगायची गरज नाही. पोलीस दरबारी १७ जनावरे  मय्यत झाल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात या वाहनात ६० वर जनावरे होती हेही लपून राहिलेले नाही. मूल तालुक्यातून जनावरे गोळा करणे व हैदराबादला कत्तलीसाठी पाठविणे हा सुरू असलेला गोरखधंदा वाहन अपघातून उघड झाला आहे. 

         सवाल हा आहे की पोलीस दरबारी जर फक्त १७ जनावरांची नोंद आहे तर बाकी जनावरांचे काय झाले? याचे अचूक उत्तर आकापूर गावातील बडी आसामी असलेला व ज्याच्या शेतात ही घटना घडली तो मदिराविक्रेता हमखास सांगू शकेल.

           अपघातग्रस्त वाहनातून काही जिवंत जनावरे पोलिसांना खबर देण्याआधी कुठे पाठविण्यात आलीत? काही मृत जनावरांना कुठे पुरण्यात आले? याचाही शोध सहज घेता येऊ शकेल.

           वाहन भरधाव वेगाने असल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. वाहनाला जेसीबी च्या साहाय्याने रस्त्याचा खाईतून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु केली.

***

अवैध गो तस्करीला पाठबळ देण्याचा प्रकार..

            सूत्रांच्या माहितीनुसार ह्या जनावरांची तस्करी हैद्राबादच्या कत्तलखान्यात करण्यात येणार होती. सदर अपघातग्रस्त ट्रक छत्तीसगढ पासिंगचा आहे. या ट्रकमधील सारी जनावरे मूल तालुक्यातील, कत्तलीसाठी जातात तेलंगणात, याचाच अर्थ इथून मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी चालते. हा जल्हाद कोण? याचे उत्तर टेकाडी या गावातून मिळू शकेल असे बोलले जाते. “किस्मत” खराब म्हणून ही तस्करी पुढयात आली असे बोलले जात आहे.

       घटना घडली,गो तस्करीचे बिंग उघड पडले.कत्तलीआधी जनावरे अपघातात मरण पावली. पण हा विषय रफादफा करण्यात पुढाकार घेणारा, स्वताला पांढरपेशा समजणारा आकापूरातील तो प्रतिष्ठित कोण? उलटपक्षी स्वताला जनसेवक समजणाऱ्या या गोधनविरोधी, कंटकाणे पोलिसांना बोलावून ६० ते ७० जनावरांचा जल्हाद ठरलेल्यांना मुठमाती देण्यात पुढाकार घेतला असता तर तालुक्यात अधिक नाव झाले असते. पैशाची लालसा कुणाला कुठल्या स्तरावर नेईल हे या प्रकरणातून स्पष्ट झाले असे बोलले जात आहे.

          घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून ५,१० हजारावर हात मारून अवैध गो तस्करीला पाठबळ देताऱ्या त्या काही पत्रकारांना काय समाधान मिळाले यावर जनचर्चा सुरू झाली. ही बाब पत्रकारीतेला अधिक काळोखीत करणारी ठरते.