साखेरा गावातील मुले शिक्षणासाठी जिवावर उदार… — मृत्यूला सामोरे जात गिरवितात शिक्षणाचे धडे!,”कुणी वाली आहे काय?

प्रा.भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

      सध्या देश अमृत महोत्सव साजरा करिता आहे.गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाल्याचा दिडोंरा लोकप्रतिनिधी व प्रशासन पिटत आहेत.परंतु धानोरा तालुक्यातील कारवाफा‌ येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जिवावर उदार होत किंवा जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी नदी ओलांडून जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

       साखेरा गावातल्या विद्यार्थी मुलामुलींना आणि नागरिकांना मनात प्रश्न निर्माण होत आहे की,खरच गडचिरोली जिल्हाचा विकास झाला काय?

          शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.साखेरा आणि इतर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोटफोडी नदीच्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते.

         या नदीवर उभारल्या जात असलेल्या नवीन पुलाचे काम अर्धवट आहे.त्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून जाताना कपडे भिजण्यासह पाय घसरून प्रवाहात वाहून जाण्याचाही धोका या विद्यार्थ्यांनं पुढे निर्माण झालेला आहे.याचबरोबर जेव्हा नदिला पाणी भरपूर असते तेव्हा शिक्षणाला मुकायची पाळी येते.

       जास्त पाऊस झाल्यानंतर नदीचा प्रवाह वाढतो.अशा स्थितीत नदी ओलांडणे जीवावर बेतू शकते.पण शिक्षणासाठी विद्यार्थी हा धोका पत्करताना दिसत आहेत.प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी स्कूल बससेवा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.

       साखेरा गावातील विद्यार्थ्यांना कारवाफा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,लालमशाह मडावी माध्यमिक विद्यालय व इतर दोन शाळांमध्ये शिकण्यासाठी जावे लागते.साखेरा-कारवाफा दरम्यान वाहणाऱ्या पोटफोडी नदीवर एक छोटा पूल होता. 

        पावसाळ्यात हा पुल पुराच्या पाण्याखाली येत असे.त्यामुळे चातगाव-पेंढरी मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती.या समस्येतून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोटफोडी नदीवर नवीन पुल बांधण्याच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासन व शासनाकडून मंजुरी देण्यात आली.

         त्यानंतर पोटफोडी नदीवर नवीन पुल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. पावसाळा लागल्याने सध्या या पुलाचे बांधकाम अपूर्ण स्थितीत बंद ठेवण्यात आले आहे.

            कंत्राटदाराला दिलेली बांधकामाची मुदत भरण्यास आणखी बराच अवधी शिल्लक असल्याचे उपविभागीय अभियंता रविंद्रसिंह चट्टा यांनी सांगितले.

           कारवाफा येथेच प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे.नदीच्या अडचणीमुळे पावसाळ्यात आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर येऊ शकते.