ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
भंडारा – जिल्ह्यात सन २०२१ पासून कलावंत मानधन निवड समिती नसल्याने अनेक कलावंत ठरवून दिलेली वयाची अट पूर्ण करूनही मानधनापासून वंचित आहेत. लवकरात लवकर समिती तयार करून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा जिल्ह्यातील कलावंतांना आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागेल असा इशारा भंडारा जिल्हा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले यांनी दिला आहे.
राज्यात विविध क्षेत्रातील कलावंत यांची वयाची विशिष्ट अट पूर्ण केल्यानंतर राज्यशासनाच्या वतीने सरसकट ५००० रुपये मानधन दिले जाते. यासाठी पंचायत समिती मार्फत प्रस्ताव पाठविले जातात. आतापर्यंत अनेक प्रस्ताव पाठविले गेले आहेत.परंतु २०२१ पासून जिल्ह्यात कलावंत मानधन निवड समिती नसल्याने कलावंतांच्या फाईल कार्यालयात धूळ खात पडलेल्या आहेत.
प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना निवेदन देऊन सुद्धा अजून पर्यत ही कलावंत निवड समिती तयार करण्यात आली नाही. त्यामुळे ३ वर्षांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे सहित कलावंताची फाईल पंचायत समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मध्ये पडून आहेत.
त्यासाठी तात्काळ निवड समिती तयार करावी व कलावंताना विशिष्ट वयानंतर मिळणारी मानधन योजना सुरू करण्यात यावी. अन्यथा कलावंतांच्या वतीने संगीतमय आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले यांनी दिला आहे.