बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पालखी सोहळे हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राचे वैभव आहे. विठ्ठल साऱ्या विश्वाचे दैवत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.10) काढले.
हर्षवर्धन पाटील यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बुधवारी तरंगवाडी ते इंदापूर पर्यंत पायी चालत सोहळ्यात सहभाग घेतला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. दरम्यान, तरंगवाडी येथे हर्षवर्धन पाटील यांनी तुकाराम महाराज पादुकांचे दर्शन घेतले. सदर प्रसंगी देहू संस्थांचे माजी अध्यक्ष ह भ प बापूसाहेब मोरे महाराज यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा अद्वितीय असा उत्सव आहे. आमच्या पाटील घराण्याला वारकरी परंपरा आहे. मी गेली 30-32 वर्षे नियमितपणे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी चालत सहभागी होत आहे. पालखीमध्ये वारकऱ्यांसमवेत पायी चालताना मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, अशी भावना प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पायी चालत असताना हर्षवर्धन पाटील यांनी पालखी सोहळा प्रमुखांशी तसेच ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्तांशी संवाद आली.
राज्यात सध्या पावसाने अनेक भागात ओढ दिल्याने शेतकरी, नागरिक व समाजातील सर्वच घटक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विठ्ठलचरणी व संत तुकाराम महाराजांच्या चरणी समाधानकारक पाऊस होऊन, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. दरम्यान, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी अकलूज नाका येथे संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले.