वकीलास मारण्याची धमकी देणाऱ्या ‘त्या’ लिपिकास सात दिवसात सेवेतून बडतर्फ करण्याची दर्यापूर वकील संघाची मागणी…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

            दर्यापूर तहसिल कार्यालयात जन्म मृत्यूच्या प्रलंबित प्रकरणाची विचारणा करण्याकरीता गेलेल्या वकीलास दर्यापूर तहसिल कार्यालयातील लिपिकाने हुज्जत घालून शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिल्याची घटना दि 28 जूनला घडली.

             ऍड विवेक सदाशिव इंगळे हे दि. 28 जून रोजी दर्यापूर तहसिल कार्यालयातील लिपिक फुके यांच्याकडे जन्म मृत्यूच्या प्रलंबित केसेसबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता लिपिक फुके याने ऍड विवेक इंगळे यांना योग्य माहिती न देता उलट त्यांना दमदाटी करुन हुज्जत घालीत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व कार्यालयातून हाकलून लावले.

            अशा प्रकारे संबंधित लिपिकाने दादागिरी करुन ऍड इंगळे यांना अपमानित केले. त्यामुळे लिपिक फुके यास 7 दिवसाच्या आत सेवेतून बडतर्फ करुन कारवाई करावी अशी मागणी दर्यापूर वकील संघाच्यावतीने तहसिल व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून सदर लिपिकावर योग्य ती कारवाई न केल्यास त्याच्या निषेधार्थ दर्यापूर वकील संघाच्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दर्यापूर वकील संघाचे अध्यक्ष ऍड धर्मेंद्र आठवले यांनी वकील संघाच्या वतीने दिला आहे.