मुख्याध्यापिका वंदना पोहाणे यांना सेवानिवृत्ती निरोप… — शाळेच्या पहिल्याच दिवशी खंडाळ्यात विद्यार्थीही भारावले…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संचालित, टिळक विद्यालय खंडाळा येथील मुख्याध्यापिका वंदना गुलाबराव पोहाणे ह्या ता. ३० जूनला सेवानिवृत्त झाल्यात.

        मात्र ३० जून रविवार आल्याने त्यांना सोमवारी १ जुलै २०२४ रोजी विद्यार्थी, पालक, गावकरी, शाळा व्यवस्थापण समिती आणि शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

            एकाच शाळेत सलग ३४ वर्ष पोहाणे यांनी सेवा दिल्याने गावकरी, विद्यमान तसेच माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र लांजेवार, सत्कारमूर्ती मुख्याध्यापिका वंदना पोहाणे व त्यांचे ८६ वर्षीय वडील लक्ष्मणराव बावनकर, सुपुत्र डॉ. अक्षय पोहाणे, पोलीस पाटील शेखर निर्वाण, माजी पं.स. स. मीरा लांजेवार, माजी सरपंच शारदा लांजेवार, शारदा देवेंद्र लांजेवार, से.नि. शिक्षक गोबाडे, दिनेश लांजेवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मच्छिंद्र पुस्तोडे, आशिष चेडगे, रवी भोंगाने प्रामुख्याने उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या गौरवगिताने करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या मुख्याध्यापिकेला औक्षवंत करून कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यात आले.

          याप्रसंगी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यादरम्यान सत्कार कार्यक्रमाला उत्तर देतांना व्यासपीठावरील उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शाळेतील ३४ वर्षाच्या सेवेचा उल्लेख करून पोहाणे यांचे शाळेतील आणि गावातील प्रचंड योगदानाचे, सहकार्याचे महत्त्व विशद केले.

         मुलीच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला ८६ वर्षाचे वडील, आईच्या कार्यक्रमाला मुलगा डॉ. अक्षय उपस्थित असल्यामुळे वडील मुलगी आणि नातू एकाच व्यासपीठावर असणे हा दुग्धशर्करा योग हा कार्यक्रमाचा नाविन्यपूर्ण भाग ठरला.

          सत्कारमूर्ती वंदना पोहाणे सत्कार कार्यक्रमाला उत्तर देतांना म्हणाल्यात की, माझे विद्यार्थीच माझे बक्षीस आहे. खेडे गावाचे मूल्य काय असते हे माझ्या आई वडीलांनी शिकविले. वडिलांची शिस्त आणि संस्कार मला इथपर्यंत घेऊन आले. “आयुष्याची शिदोरी संपतही नाही आणि उरतही नाही” फक्त ती शिदोरी आपण काळजीपूर्वक किती जतन करतो यावर अवलंबून असते.

         याप्रसंगी माजी विद्यार्थीनी विशुताई बोरकर, ट्विंकल मेश्राम, दुर्गा ऊके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक अरविंद निर्वाण संचालन मनीषा मेश्राम तर आभार प्रदर्शन संगीता पुस्तोडे यांनी केले.

            संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे समस्त सहाय्यक शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंद प्रशांत कापगते, राहुल करंजेकर, नियुक्त टेंभुर्णे, पांडुरंग मुंगुलमारे, जयेश कापगते, सुनील मेंढे आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.