दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : गेली 40 वर्षे मी कोणत्याही राजकीय व्यासपीठावर गेलेलो नाही. कारण, मी अभिनेता आहे, पक्षाचा कार्यकर्ता नाही. गेल्या चार-पाच दिवसांत राजकारणात ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यावरून आमच्यापेक्षा खूप मोठे विनोदी अभिनेते त्या क्षेत्रात आहेत हे जाणवले
आम्हा कलाकारांचे फक्त रसिक प्रेक्षकांशी नाते असते, कार्यकर्त्यांशी नाही,’ असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी शनिवारी मांडले. राजकीय भूमिका मांडायची की नाही, याचे स्वातंत्र्य कलाकाराला असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
‘आम्ही सारे ब्राह्मण’तर्फे प्रशांत दामले यांना ‘ब्राह्मणभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने राजेश दामले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले बोलत होते. कार्यक्रमात डॉ. सागर देशपांडे यांना ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार, मानसी बडवे यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार’ पुरस्कार आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेला ‘भगवान परशुराम ब्राह्मण संस्था’ पुरस्कार दिला. महाराष्ट्र चित्पावन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, भालचंद्र कुलकर्णी, डॉ.भावार्थ देखणे उपस्थित होते.
मुंबईत कलाकारांच्या राहण्याची सोय व्हावी
राज्यात 49 नाट्यगृहे आहेत, ती अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे काम आहे. नाट्यगृहांना सोलर सिस्टीम लावायला हवी. मुंबईत कलाकारांना राहण्याची सोय नाही. त्यांना किमान सहा महिने 2 हजार रुपयांत राहण्याची सोय करायला हवी, असे प्रशांत दामले यांनी मत मांडले.