लोहारा येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी…

अश्विन बोदेले

जिल्हा प्रतिनिधी 

 दखल न्यूज भारत 

आरमोरी :- तालुक्यातील लोहारा येथे बहुजन समाज पार्टी च्या वतीने आरक्षणाचे जनक , लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

             या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. वामानजी राऊत माजी जिल्हाध्यक्ष बसपा, तर मार्गदर्शक म्हणून श्री. कृपानंद जी सोनटक्के विधानसभा अध्यक्ष बसपा हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सिद्धार्थ जी घुटके तालुकाध्यक्ष बसपा हे उपस्थित होते. 

          यावेळी सर्वप्रथम मान्यवरांनी आरक्षणाचे जनक, लोकराजा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

           यावेळी मार्गदर्शन करताना आरमोरी विधानसभा अध्यक्ष श्री. कृपानंदजी सोनटक्के यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राजेशाही असो की लोकशाही तिथे प्रमुख असणारी व्यक्ती समाजाच्या कल्याणाबद्दल काय बोलते, काय विचार करते, आणि कोणते कायदे करते यावरून त्या व्यक्तीचे मोठेपण अधोरेखित होते.

            राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानात जे कायदे, नियम केले, आदेश काढले, ते पाहिल्यानंतर हा राजा माणूसपणाची उंची वाढविणारा होता हेच आजही अधोरेखित होते. असे आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले. 

         तर बसपा तालुका अध्यक्ष श्री.सिद्धार्थ घुटके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक आहेत. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबविले असे सांगितले. 

           तर आपले अध्यक्षिय भाषणात श्री. वामन जी राऊत माजी जिल्हाध्यक्ष बसपा यांनी सांगितले की, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. 

         स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांचे वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशा प्रकारे मार्गदर्शन केले. 

          यावेळी या कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.