खेड तालुका सामाजिक शास्त्रे अध्यापक संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान… 

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

आळंदी : खेड तालुका सामाजिक शास्त्रे अध्यापक संघाच्या वतीने ‘विषुवदिना’ निमित्त घेण्यात आलेल्या वकृत्व व सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांचा ज्ञानेश्वर विद्यालयात सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता.

           यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, राजश्री तटकरे, संजय बोरकर, दयानंद शिंदे, यांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य दीपक मुंगसे, उर्मिला पिंगळे, शोभा भोंगाळे, मोहन पवळे, सचिव पी.आर.घेनंद, सुदाम मोहरे, सुर्यकांत खुडे, अतुल पवार, जी.बी.पोटवडे आदी उपस्थित होते.

         संजय बोरकर यांनी सामाजिक शास्त्री संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत विषय समित्यांची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. राजश्री तिटकारे यांनी विद्यार्थ्यांना दिशा देणारे शिक्षण असले पाहिजे तसेच शिक्षण क्षेत्रातील बदल शिक्षकांनी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे सांगत सराव केल्याने विद्यार्थ्यांची प्रगती कोणीही आडवू शकणार नाही असे विचार व्यक्त केले.

         अजित वडगावकर यांनी विषुवदिनाचे महत्त्व सांगून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यावर उपाययोजना करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच संतांच्या भाषेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे संतांचे विचार आत्मसात करून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे असे पर्यावरण संरक्षणासंबंधी आवाहन केले.

         याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे अध्यापक सूर्यकांत खुडे समवेत खेड तालुक्यातील अनेक अध्यापकांना उपक्रम कृतिशील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

         सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शेठ कांतीलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.