दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळा रथासाठी निवड झालेल्या कुऱ्हाडे पाटील मानकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केली असून, मानाची ही बैलजोडी आळंदीत दाखल झाली आहे. दरम्यान, “हौश्या व बाजी’ आणि “माऊली व वजीर” असे बैलांचे नामकरण करण्यात आले आहे. या मानाच्या बैलजोडींची उद्या आळंदीत हरीनामाच्या गजरात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
उद्या दुपारी चार वाजता चाकण चौकातून मिरवणुकीस सुरुवात होऊन महाद्वार चौकात सांगता होणार आहे. महाद्वारात आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ व विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे हे मानाच्या बैलजोडींचे पुजन करतील यावेळी, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, महेश लांडगे, सुनील शेळके, बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, पालखी सोहळाप्रमुख बाळासाहेब आरफाळकर, तसेच आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती बैलजोडीचे मानकरी सिध्देशभैया कुऱ्हाडे यांनी दिली आहे.
यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला आळंदीतील सहादू बाबूराव कुऱ्हाडे (वस्ताद) यांच्या बैलजोडीला मान मिळालेला आहे. पालखी प्रस्थानाला एक आठवडा असल्याने मानकऱ्यांकडून बैलांचा दम वाढविण्यासाठी चालण्याची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.
माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा येत्या २९ जूनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर कुऱ्हाडे कुटुंबीयांनी दोन बैल जोडी विकत घेतली आहे.
या बैलजोडींचे ‘हौश्या व बाजी’ आणि “माऊली व वजीर” असे नामकरण करण्यात आले आहे. आळंदीत या दोन्ही बैलजोडी दाखल झाल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून पूजा करण्यात आली. माऊलींचा रथ ओढण्याचे भाग्य बैलांना मिळत असल्याने आनंदी असल्याची भावना बैलजोडी चे मानकरी योगेश कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली.