आळंदीत रविवारी वेद तपोवन मध्ये रक्तदान व आरोग्य शिबीर… — श्री आळंदी धाम सेवा समितीच्या माध्यमातून आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते, त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन श्री आळंदी धाम सेवा समितीच्या माध्यमातून श्रीराम न्यास मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली रक्तदान व आरोग्य शिबिराचा संकल्प केला आहे. हे शिबिर आळंदी मोशी रोडवरील वेदश्री तपोवन परिसरात रविवारी दि.१६ रोजी संपन्न होणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री आळंदी धाम सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

             यावेळी भव्य रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, आरोग्य शिबीर, स्त्रीरोग तज्ञांकडून महीलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी कमलेश हाॅस्पीटल, चव्हाण हाॅस्पीटल, जगताप क्लिनिक, धारा हाॅस्पीटल, सुर्या ऑप्टिकल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

            रक्तदान केल्यानंतर लिक्विड घेताच रक्तवाढीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे वयवर्षे १८ ते ६५ यातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. १८ ते २५ वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान केले पाहिजे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळते.

             कृत्रिमरित्या रक्त तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान करून आपण कोणाचा तरी प्राण वाचवू शकतो, जीवन दाता बनू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावे असे आवाहन श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण आणि सर्व सहयोगी संस्था यांच्या वतीने करण्यात येत आहे.