पालखी मार्गावरील जाहिरात फलकांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : पालखी मार्गावर अतिक्रमणे असल्यास ती तत्काळ काढून टाकावीत. सुरक्षेच्यादृष्टीने पालखी मार्गावरील, नगरपालिका हद्दीतील सर्व जाहिरात फलकांची (होर्डिंग्ज) तपासणी करावी. अवैध आणि असुरक्षित सर्व जाहिरात फलक काढून टाकावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

         श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

        जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याचे पाहता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने मार्गावरील सर्व हॉटेलमधील खाद्यापदार्थांची नियमित तपासणी करावी, त्रुटी आढळलेल्या ठिकाणी कठोर कारवाई, प्रसंगी परवाना रद्द करा.

          तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. आपल्या घरातील शौचालये वारकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यास पालखी मार्गावरील इच्छुक नागरिकांच्या घरांना वेगळे मार्किंग करा. वारी पुढे गेल्यानंतर मागील गावातील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी महामार्गावरील कामे पूर्ण करण्यासह अडथळे काढावेत. एनएचएआयने पोलीस, उपविभागीय अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करुन त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. दिवसे यांनी या वेळी सांगितले.

          संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी दीड हजार, संत तुकाराम महाराज पालखीसाठी एक हजार आणि संत सोपान महाराज पालखीसाठी पालखी मुक्कामी, विसाव्याच्या ठिकाणी दोनशे शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. तिन्ही पालख्यांसाठी मिळून १२ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पाण्याचे स्राोत, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, फिरते आरोग्य पथक, औषधे, रुग्णवाहिका यांची आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्याकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे.