महापतिव्रता रमाईचे निर्वाण…

२७ मे इतिहासातील एक काळा दिवस. याच दिवशी कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात अंधार झाला. बापांचाही बाप म्हणजेच महामानव दीनदुबळ यांचा कैवारी जगाचा ज्ञानभास्कर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऊर्जायनी माता रमाई यांचे निर्वाण झाले.सर्व देश दुःख सागरात बुडाला.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर वेरुळच्या सहलीहून परत आले होते.माता रमाई अंथरुणावर खिळून पडल्या होत्या. १६ जानेवारी१९३५ ला त्यांचा आजार वाढला होता. रमाईंना बऱ्याच डॉक्टरांचे उपचार चालू होते. सतत चार महिने त्यांच्या प्रकृतीत चढ उतार चालू होता. त्यावेळी डॉ.बाबासाहेब पणवेल येथे मुलांच्या वसतिगृहाच्या स्थापनेत गुंतले होते. तेव्हा त्यांना तातडीने मुंबईस परत येण्यासाठी निरोप पाठवला गेला. साहेब परत आले. तेव्हा माता रमाईंची तब्येत खुपच खालावलेली होती. तेव्हा बाबासाहेब रमाई जवळच बसून होते. रमाईं बाबासाहेबांकडे सारखे टक लावून बघत होती.

             रमाईचे काळीज हे वाघाचे काळीज होते, ती कधीच स्वतःच्या मृत्यूला घाबरत नव्हती. तिच्या जीवनात एकाच गोष्टीला घाबरायची आणि ते म्हणजे बाबासाहेबांच्या जीवाला काही धोका होऊ नये. याचसाठी तिचा जीव डोळ्यात जमा झाला होता. तिच्या तब्येत तिला सांगीत होती. की तू बाबासाहेबांना जीवनभर साथ देवू शकणार नाहीस. म्हणून ती बाबासाहेबांना अधूनमधून म्हणायची.

          ‘आता माझी एकच अपेक्षा आहे, मला भरल्या कपाळान,हिरव्या लुगडयात जायला मिळावं’.जणू ही वेळ येवून ठेपलेली होती.त्यांना बोलण्यासाठी बळ उरले नव्हते. शब्द फुटत नव्हते.त्यांना खूप काही सांगायचे होते. फक्त त्यांचे डोळेच बोलत होते. उघड्या डोळ्यांनी ती फक्त साहेबांना भरपूर मनसोक्त मनाने पहात होती, न्याहळत होती.

           साहेब त्यांना स्वतः औषधपाणी देत होते. बशीत कॉफी ओतून घेण्यासाठी आग्रह करीत होते. मोसंबीचा रस पिण्यासाठी आग्रह करीत होते. इच्छा नसतानाही रमाई आग्रहाखातर थोडेसे घेवून मान ठेवीत होत्या.

            शेवटी २७ मे उजाडला. रमाईचा श्वासोच्छ्वास मंदावत चालला होता. सकाळचे नऊ वाजत होते. सूर्य वर चढत होता पण इकडे बाबासाहेबांच्या जीवनात काळाची रात्र होत होती. बाबासाहेबांचे रमाईच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष होते. बाबासाहेब तिच्याजवळ असे क्वचितच बसले असतील. हा बहिष्कृतांचा -हदयसम्राट आपल्या पत्नीजवळ इतक्या व्याकूळ मनाने पूर्वी कधीच बसला नव्हता. समाजाच्या दुनिया भरच्या प्रश्नान कधी घटकाभर सुख पाहूच दिले नव्हते. आज वेळ होता,पण काळ राक्षस होऊन उभा होता. हळूहळू डोळे मिटत होते. साहेबांपासून रमाला काळ ओढून नेत होता. पाहण्याशिवाय साहेब काहीच करु शकत नव्हते. हा आधार वड कोसळतांना फक्त पहात होते, आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले…

           अचानक रमाईचे शरीर शांत झाले.बाबासाहेबांनी हंबरडा फोडला.’रामू..sss। मला सोडून गेलीस.”तुला मी काहीच सुख दिले नाही.’पण मला तुझी साथ हवी आहे..’मला सोडून जावू नकोस..”तु माझ्यासाठी फार मोठा त्याग केलास.’असे म्हणून बाबासाहेब ओक्साबोक्शी रडत होते.

           आई…आई..ss. म्हणून यशवंत रडत होता. रमाई कवटाळत होता. त्याचे माये छत्र हरवले होते.रमाई फक्त यशवंताची माता नव्हती तर ती सर्व कुटुंबाची कोटीजणांची माता होती.

               सारे कुटुंब आक्रोश करीत होते. पहाता पहाता ही दुःखद बातमी मुंबईभर पसरली. तसे लोक आपली हातातील कामे टाकून कारखाने, गिरण्या सोडून राजगृहाच्या दिशेने धावत येत होती. सारा गोरगरीब,चाहता वर्ग, बहुजन समाज आपल्या महामातेसाठी वियोगाने अश्रू ढाळीत राजगृहाच्या समोर उभा होता.

       जवळजवळ ४० ते ५० हजार लोकांचा समुह मुंबईत रमाईचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जमला होता.रमाईची अंतयात्रा निघण्याची तयारी सुरू होती. त्यांचे शव लोकांच्या दर्शनासाठी ठेवले होते.खूप गर्दी वाढली होती.

            डॉ.बाबासाहेब साहेब म्हणाले,’माझ्या रामूला पांढरे पातळ आवडत असे, तिला शेवटची इच्छा म्हणून पांढरे पातळ आणा.’पण उपस्थितांपैकी काहीजणांनी सौभाग्यवतीसाठी हिरवे पातळच असते,असे सांगितले. त्यावर बाबासाहेबांनी मुक संमती दिली.

            रमाईची अंतयात्रा निघाली. यशवंत रमाई आणि बाबासाहेबांचा एकुलता एक मुलगा होता. तो हातात शिंकाळे घेवून अंतयात्रेच्या समोर रडत रडत चालत होता. 

            अंतयात्रेत मडकेबुवा समता सैनिक दल आणि जनसमुदायास दिशा दाखविण्याचे काम करीत होते. मुंबईतील रस्ते लोकांनी तुडुंब भरले होते.

           वरळीच्या स्मशान भूमीत रमाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेबांनी रमाईला अग्नीडाग दिल्यानंतर पुन्हा टाहो फोडला. जमलेल्या लोकांनी त्यांची समजूत काढली.

           २७ मे ची रात्र म्हणजे साहेबांना रमाईच्या आठवणीने दुःखमय आणि सर्व भूतकाळ समोर उभा करणारी रात्र होती. त्यांनी जेथें रमाईस ठेवले होते. त्याकडे बाबासाहेब डबडबलेल्या डोळ्यांनी टक लावून पहात होते, तीच आज रिकामी जागा रमाई होऊन बोलत होती.

            ‘साहेब, माझ्यासाठी आता रडू नका, या देशातील तमाम बेवारस दुःखी तुमची वाट पहात आहेत.’तुम्ही जळणाऱ्या जंगलाना आणि रडणाऱ्या आकाशाला कुशीत घेणारे आहात.दुःखी विश्व तुमच्या हातान स्वतःची आसवं पुसून घेतात.’तुमचा हात डोळ्यांना आसवांच्या पुरातून बाहेर काढणारा आहे.’माणसांच्या सौंदर्याचे संविधान लिहणारे आहे.या हाताला आणि या डोळ्यांना स्वतःच्या आसवांत गुंतवू नका. ह्या आसवांना थांबयला सांगा.’

               भीमरावांचा बाबासाहेब करण्यामध्ये रमाईचा सिंहाचा वाटा होता. बाबासाहेब बँरिस्टर झाले. परदेशात शिक्षणासाठी राहिले. ते फक्त रमाई मुळेच. कारण वडील सुभेदार असेपर्यंत कुटुंबात डोकावून पहाण्याची गरज बाबासाहेबांना कधीच पडली नाही. पण जेव्हा सुभेदार रामजी निवर्तले, तेव्हा मात्र त्यांचा आधारच गेला होता. हया परिवारातील कुटुंबाला सोडून बाहेर शिक्षणासाठी जाणे अशक्यप्राय होते. कुटुंबात लक्ष्मी वहिनी, मुकुंद, यशवंत, रमाई आणि आत्या मिराबाई होती.त्यात मिराबाई ह्या अपंग होत्या.

            पण सुभेदार रामजी नंतर ही कुटुंबाची धुरा रमाईने यशस्वीपणे सांभाळली होती. अस हत्तीच काळीज घेवूनच ती जन्माला आली होती.

              बाबासाहेबांचे परदेशातील पूर्ण शिक्षण होई पर्यंत रमाईने जीवाचे रान केले. हालअपेष्ठा सहन केल्या. उपाशी तापाशी राहून घर संसार चालविला. दिलेल्या पैशात काटकसर करुन संसाराचा गाडा हाकीत नेला. गोवऱ्या थापल्या .पण कोणासमोर मदतीसाठी हात पसरला नाही. एका बँरिस्टरची पत्नी म्हणून लाजून घरात बसली नाही. की गळ्यात सोन्याच्या दागिन्यांसाठी बाबासाहेबांना त्रास दिला नाही. बाबासाहेबांच्या सत्कारा वेळी त्यांना लुगडे नव्हते. तेव्हा त्या राजर्षी शाहू राजाने दिलेला पटका नेसून गेल्या. पण त्यात कमी पणा मानला नाही.

             एका नंतर एक अशी चार अपत्य तिने या देशासाठी अर्पण केली. पण या दुःखाची आस बाबासाहेबांना पोहचू दिली नाही.कारण रमाईला माहीत होते. बाबासाहेब तळागाळातील समाजाच्या उद्धारसाठी लढत आहेत. जगाच्या सुखासाठी त्यांची धडपड आहे.

              म्हणून त्या कशाचा आग्रह करीत नसत. योग्यवेळी त्यांना रमाई धीर द्यायच्या. बाबासाहेब रात्ररात्र अभ्यास करायचे. वेगवेगळे समाजाचे लढे लढायचे. रमाई फक्त त्यांच्या जीवाची काळजी करायची.

               आता जणू बाबासाहेबांचा आधारवड कोसळला होता.विविध आठवणीने ते चक्रावून गेले होते.रमाईचा त्याग फार महान होता. तिच कर्तृत्व आकाशाच्या कवेत न मावणारं होत.

            कारण रमाईच्या ह्या फार मोठ्या त्यागानेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानसागराच्या तळापर्यंत जाता आले होते.अशी ही महान रमाई पुन्हा घडणार नाही. येणार नाही.पण प्रत्येकाला जीवन काय असते. हे शिकवित राहणार आहे. एक आदर्श गृहिणी कशी असावी. ही रमाईच्या जीवनातून शिकले पाहिजे. कारण संसारात जगताना येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची ताकद ही रमाई देत असते. प्रत्येक स्त्री ही पतिव्रतेचे पालन करुन संसाराला वैभव मिळवून देत असते.पण रमाई ही त्याहीपेक्षा वेगळी पतिव्रता म्हणून संबोधली पाहिजे.

           म्हणून रमाई ही महापतिव्रताच मानवी लागेल.माता रमाईच्या त्यागमूर्ती जीवनास नतमस्तक होतो.

        बाबुराव पाईकराव

          डोंगरकडा

                  ९६६५७११५१४