भाविक करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
मुरुमगाव येथील विधवा महिला शेतकरी राधाबाई बहादुर गवर्णा यांच्या मालकीचा बैल गोठ्याच्या बाहेर असताना दिनांक 6 मे ला सकाळी 5 वाजे दरम्यान अचानक वीज कोसळल्याने बैल ठार झाला.
सकाळच्या प्रहरी बैल गोठ्याच्या बाहेर काढले जातात व शेण गोळा केला जातो, त्यासाठी त्यांचा मुलगा लक्ष्मण बहादुर गवर्णा हा एक बैल बाहेर बांधून दुसरा बैल बाहेर काढण्यास गोठ्यात गेला तेवढ्यात वीज कोसळली व बैल ठार झाला.सुदैवाने जीवित हनी टळली.
या घटनेची माहिती पशू विकास अधिकारी आर. जी. गालफाडे यांना देण्यात आली,त्यांनी पंचनामा करून शवविच्छेदन केले.
यावेळी सरपंच शिवप्रसाद गवर्णा, नेगुराम कोठवार, लक्ष्मण गवर्णा,व गावकरी उपस्थित होते.
ठार झालेल्या बैलाची अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये असल्याने,आता शेती हंगाम कसा करावा असा यक्ष प्रश्न विधवा शेतकरी महिलेसमोर निर्माण झाला आहे. अवकाळी विज पडून संकटात सापडलेल्या विधवा शेतकरी महिलेला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी ,अशी मागणी होत आहे.