साहित्य क्षेत्रात आंबेडकरी साहित्याने आपले विशेष वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एक प्रतिभाशाली साहित्य म्हणून ते ओळखले जाते.
कारण आंबेडकरी साहित्य कल्पनाविलास नाही,तर ते जीवंत साहित्य म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. एवढेच नाही तर ते माणूस केंद्रित साहित्य असते. मानवजातीला सुखी जगण्याचा मार्ग शिकविणारे ते साहित्य आहे. आंबेडकरी विचारधारा ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम हे आंबेडकरी साहित्य करीत आलेले आहे. या साहित्याने प्रतिभावंत कवी, लेखक, विचारवंत, व्याख्याते जन्माला घातले आहेत. त्यांची आंबेडकरी तेजाने गतिमान होणारी लेखनी समाजन्नोती करण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. यापैकीच प्रसिद्ध लेखक, विचारवंत, व्याख्याते डॉ. दत्तात्रय गायकवाड यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा जल समाजवादावरील उल्लेखनीय कार्याचा परिचय करुन देणारा ग्रंथ’ भारतीय जलसंस्कृती आणि डॉ. आंबेडकरांचा जलसमाजवाद’ माझ्या हाती आला आहे. तो पाहताक्षणी मानसांच्या मनात भरणारा आणि तो वाचकांना ऊर्जा देणारा वाटतो.या ग्रंथाचे मुखपृष्ठ चित्रकार संतोष धोंगडे यांनी इतके आकर्षक आणि बोलके बनवले आहे,की ग्रंथाच्या आत काय आहे, हे मुखपृष्ठच वाचकांना सांगते.
तर त्यास पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे उपाध्यक्ष तथा भारतीय जलसंस्कृती मंडळ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी या ग्रंथास प्रस्तावना दिली आहे. त्यांनी या ग्रंथाची महती सांगताना ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी म्हणतात, पाश्चिमात्य देशात कोणत्याही अभ्यासाची सुरुवात ‘प्लेटो’आणि ‘अँरिस्टाँटल’ या दोन महनीय व्यक्तीपासून सुरू होते. मग तो राजकीय, वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक किंवा अध्यात्मिक असो. तीच गोष्ट बाबासाहेबांबद्दल तंतोतंत आहे. भारतातील सामाजिक,वैज्ञानिक, राजकीय, वैचारिक, किंवा आर्थिक कोणतेही कार्य असो किंवा कोणतेही क्षेत्र असो त्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून होते.हे नक्कीच.ते पुढे म्हणतात, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जलक्षेत्रातील आयकॉन मानतो.त्यांनी देशाचे महत्त्व जाणताना अन्नदाता शेतकऱ्यांना सुद्धा तेवढेच महत्त्व दिले. येथील जमीन कशी सुपीक करता येईल यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे योग्य तंत्र सांगितले. तर या सुंदर पुस्तकावर आपले मत नोंदविताना मध्य प्रदेश इंदोरचे डॉ. माधव चितळे लिहतात,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा विचार केवळ नदी म्हणून केला नाही, ‘नदीखोरे’ म्हणून व्यापक विचार केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाण्याकडे समन्वयवादी समन्यायी व दृष्टीने पाहतात.
लेखक डॉ. दत्तात्रय गायकवाड आपल्या मनोगतामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची अभ्यासपूर्ण सविस्तर माहिती आणि भारताच्या जलसंस्कृतीचा महत्त्वपूर्ण इतिहास समजून देतात.
सदरील पुस्तकात एकूण अकरा प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात आधुनिक अर्थशास्त्राचे प्रणेते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यामध्ये डॉ. बाबासाहेब हे अर्थ शास्त्राचे कसे प्रणेते ठरतात,हा सिध्द करणारा महत्त्वपूर्ण लेख वाचकांना वाचावयास मिळतो. तो अतिशय समर्पकपणे बाबासाहेबांच्या जीवनातील विद्वत्तेचे दाखले तसेच विविध प्रसिद्ध विचारवंताची अभ्यासणीय पुरावे देवून पटवून दिले आहे.
त्यातील डॉ. आंबेडकरांचे विद्यार्थी दशेतील पहिला एम.ए.चा ‘एनशिएंट इंडियन काँमर्स,पीएचडी चा प्रोव्हिन्शीयल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि डि.एस्सी चा ‘दि प्राँब्लम आँफ रुपी’ हे तिनही ग्रंथ त्यांची अर्थशास्त्रज्ञाची ओळख करुन द्यायला पुरेशी आहेत. आज भारताचा आर्थिक व्यवहार ज्या बँकेतून चालतो, ती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या’ दि प्राब्लम आँफ रुपी ‘यावर झाली आहे. हाच महत्त्वाचा पुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय अर्थतज्ञ होते असे म्हणण्यापेक्षा जागतिक अर्थतज्ञ होते,असेच म्हणता येईल.
लेखक बाहेर देशातील अर्थ तज्ञांचा दाखला देताना सांगतात, प्रा.हेराँल्ड लास्की यांची Grammar of Politics आणि Parliamentary Government in England यांची ही जगप्रसिद्ध पुस्तके जगातील कोणताच तत्त्ववेता न वाचता पुढे जाऊ शकत नाही. तेच लास्की डॉ. बाबासाहेबांशी संपर्क साधून होते. त्यांच्या चरित्र लेखनात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गाजलेल्या शोधनिबंधाची नोंद घेऊन यांत्यांना ‘हायडन रिव्होल्यूशनरी ‘म्हणून नोंद करतात. असे अनेक प्रसिद्ध विचारवंत वाचकांना वाचायला मिळतात.
यातील दुसरे प्रकरण आहे, भारतीय जलसंस्कृतीः एक दृष्टीक्षेप हे आहे.हे प्रकरण माणूस आणि पाणी यांचा अतिशय जवळचा संबंध दर्शवितो.पाणी हेच जीवन आहे. म्हणून माणूस पाण्याजवळ रहायला गेला. यातूनच मानवी समस्या निर्माण झाल्या.एवढेच नाही तर पाण्यासाठी संघर्ष करावे लागले. आणि पाणी प्रश्न सोडविला.त्यात बुद्ध, शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर हे ही सुटले नाहीत. हे लेखकांनी उदाहरण दाखल पटवून दिले. बुद्धांच्या बाबतीत रोहिणी नदीच्या पाण्यासाठी कोलीय आणि शाक्य यांचा संघर्ष,छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ला बांधताना वापरलेल्या दगडाचे खंदकाचे तलावात रुपांतर केले. १८६८च्या काळात अस्पृश्यांना पाण्याचा हौद खुला करुन दिला, तर ब्रिटिश सरकारपुढे पाण्यासाठी बंधारे आणि तलाव बांधण्याचा आग्रह धरला. राजर्षी शाहूने १९१८ राधानगरी धरण बांधून भारताच्या जलसंस्कृतीला योगदान दिले.तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या हक्काच दर्शन १९२७ ला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन घडविला.यावरून भारताला जलसंस्कृतीचा फार मोठा वारसा लाभलेला आहे.
सदरील वसा जपत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जलसंस्कृतीला एक व्यापक स्वरूप दिले. जागतिक पातळीवर जलतज्ञ म्हणून किर्ती मिळविली.डॉ. आंबेडकर हे आर्थिकदृष्ट्या समाजवादी विचार सरणीचे होते. त्यांना राज्य समाज वाद आणि जलसमाजवादही हवा होता. यासाठी त्यांना समाजवादी लोकशाहीची विचारधारा हवी होती. जलसमाजवादात देशातील नैसर्गिक संसाधनांचे लोकशाहीकरण हवे होते. देशातील उपलब्ध जल,जंगल, जमीन आणि जनावरे या नैसर्गिक संपत्तीचे समन्यायी वाटप हवे होते.जलसमाजवाद म्हणजे धरण जलसाठ्यांचेही खासगीकरण होवू शकते. जमीनदार ,भांडवलदार निर्माण होवून खासगी व्यक्तींच्या ताब्यात जलसाठा जावू शकतो. तिथेही हुकूमशाही निर्माण होवून व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येवू शकते. ते टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जलविषयक अभिनव उपक्रम दिला. त्यातूनच जलसमाजवाद पुढे आला.
अमेरिकेतील टेनेसी नदीखोरे क्षेत्राचा औद्योगिक आणि शेती विकासासाठी उपयोगात आणली. हिच योजना बहुउद्देशीय नदीखोऱ्याचा सर्व समावेशक विकास म्हणजे पूरनियंत्रण, सिंचन, सार्वजनिक आरोग्य, नौकानयन, विद्युत निर्मिती, मत्स्य व्यवसाय, मृदा संवर्धन करण्यात आला. हा जागतिक पहिला प्रकल्प होय.१ डिसेंबर १९४७ रोजी दामोदर नदी खोरे प्राधिकरण बील संंसदेत मांडले. यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका उल्लेखनीय होती.
एवढेच नाही तर त्यांनी देशपातळीवर जल आणि वीज नीतीची पायाभरणी केली. या करीता भारतीय राज्य घटनेत घटनात्मक तरतूद करून ठेवली. नोंद१७ यादी दोन नुसार २४६ कलमांची तरतूद केली.यावरून लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब यांचा पाणी विषयक दृष्टिकोन समाजवादीच होता.त्यांनी संविधानात कलम २६२ हे पाण्यासंबंधित तंटे आणि कलम २६३ मध्ये राज्य राज्यामधील समन्वय समाविष्ट केला आणि जलसमाजवादाचा विचार पेरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जलसंसाधन धोरणे विकसित झाली. त्याचा परिणाम म्हणून केंद्रात दोन प्रमुख शक्तिशाली संस्थांची निर्मिती करण्यात आली. ‘सेंट्रल वाटरवेज,इरिगेशन अँड नेव्हीगेशन कमिशन’ आणि ‘सेंट्रल टेक्निकल इलेक्ट्रिसिटी पाँवर बोर्ड’.आंतरराज्यीय नदीजोड योजना संकल्पना मान्य करून नद्यांचा बहुउद्देशीय विकास साधण्यासाठी व सर्व समावेशक नियोजन करण्यासाठी नदी खोरे विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्याचे मान्य झाले. दामोदर नदी खोरे प्रकल्प, महानदी खोरे प्रकल्प आणि सोन नदीखोरे प्रकल्प हा त्यांच्या धोरणाचा परिणाम आहे.
डॉ. आंबेडकरांनी सर्व समावेशक विकास दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून देशाचा जलविद्युत संसाधनांचा आणि नदी खोरे याच्या सामाजिक, आर्थिक नियोजन व विकास हा महत्त्वाचा मानला.
१९०८पासून पंजाब सरकारने भाक्रा नागल बहुउद्देशीय प्रकल्पाला मूर्त स्वरूप येत नव्हते. १९४८ मध्ये त्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या मंत्रीमंडळात मजूर,सिंचन व विज विभागाचे मंत्री म्हणून कार्यकारी मंडळात असताना स्ट्रेट ग्रँव्हीटी धरण (४७८.६८मी.) बांधण्याचा व १५० मेगावँट वीजनिर्मिती केंद्राचा प्रस्ताव पारीत केला. ते आशिया खंडातील सर्वात उंच २२६मी. उंच, कँनाँल ३,४०२कि.मी. लांबी आणि १४.६०लाख हेक्टर्स जमीन सिंचनासाठी वापरली जाते. १० मार्च १९४५ च्या परिषदेत डॉ. आंबेडकरांनी सोन नदी खोरे प्रकल्प योजना अमलात आणण्यासाठी मत व्यक्त केले. उत्तर प्रदेश, बिहार यांच्या साठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री पदाच्या कार्य काळात पाच जलपरिषदांना पुर्नरचना समितीचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
पहिली जलपरिषद ३ जानेवारी १९४४ रोजी कलकत्ता येथे दामोदर नदी खोरे योजनेवर पार पाडली.
दुसरी जलपरिषद २३ आँगस्ट १९४४ कलकत्ता येथे भरली.त्यात दामोदर नदी बहुउद्देशीय विकास प्रकल्प प्राथमिक अहवालावर यशस्वी चर्चा झाली. तिसरी जलपरिषद ८ नोव्हेंबर १९४५ मध्ये कटक येथे भरली होती.ही ओरिसा तील नद्यांच्या बहुउद्देशीय विकास यावर होती. तर दोन परिषदा २५ आक्टोबर १९४३ आणि दुसरी २ फेब्रुवारी १९४५ साली दिल्ली येथे पार पडल्या. याच परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला की,देशात ऊर्जा शक्ती विषयक नीती ठरविण्यासाठी केंद्रात देशपातळीवर एक तांत्रिक संस्था असावी. ती संस्था वीज विषयी नियोजन आणि प्रोत्साहन देवून देशाचा विकास साधेल.
जलसमाजवादात शेतकरी व एकूण देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा कार्यक्रम दडलेला आहे. नदीखोरे चा विकास झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, रोजगार वाढेल, क्रयशक्ती वाढेल, त्यांच्या मेहनतीचे मोल वाढेल व एकूण गुंतवणूक वाढेल यासाठी जलसमाजवादाचा कार्यक्रम राबवायला हवा. देशाच्या औद्योगिक उत्पन्नात वाढ होवून दरडोई उत्पन्न वाढून निश्चित आर्थिक स्थिती मजबूत होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विकसित केलेल्या बहुउद्देशीय जलाशय आणि बहुउद्देशीय नियोजन या संकल्पनाच्या दृष्टीने देश हरितक्रांती व अन्न सुरक्षाकडे प्रगती करीत आहे. सध्या इतरही बहुउद्देशीय प्रकल्प कार्यान्वित विकसित केले गेले, त्यामागे डॉ. बाबासाहेबांची दृष्टी लाभलेली आहे. चंबल नदी,कोयना, नागार्जुन सागर,श्रीशैलम,तुंगभद्रा, अपर-कृष्णा, राणा प्रतापसागर, बलीमेला, परमलिकुलम अलियार, कंगसावनी कुमार धरण इत्यादी नावे सांगता येतील.
लेखक दत्तात्रय गायकवाड यांनी सविस्तर पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जल नियोजन समजून देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावरून डॉ. बाबासाहेब हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून जगाला ज्ञात आहेत. पण ते हा ग्रंथ वाचल्यावर त्यांचे अनेक पैलू माहीत होतात.
डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारताच्या जलनितीचे जलसंसाधन विकासाचे आद्य प्रवर्तक आणि शिल्पकार ठरतात.त्यांच्या विद्वत्तेची नोंद जगाने घेतली आहे. त्यांना ( Symbol of Knowledge) ज्ञानाचे प्रतिक म्हणून संबोधले गेले. संयुक्त राष्ट्रसंघाने’पायोनियर आँफ द युनिव्हर्स’ म्हणजे ‘विश्वाचा प्रणेता’ म्हणून संबोधले आहे. तर कँनडात ब्रिटिश कोलंबियाने’ वर्ल्ड साईन आँफ इक्वँलिटी ‘म्हणजे’ समतेचे जागतिक प्रतिक’ म्हणून सन्मान जाहीर केला आहे.
या ग्रंथातील एकूण अकराही प्रकरणे वाचकांच्या मनावर महत्त्वपूर्ण डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची जागतिक विचाराची पेरणी करुन जातात.
लेखक दत्तात्रय गायकवाड सरांच्या प्रतिभावंत लेखनीस खूप खूप शुभेच्छा..
बाबुराव पाईकराव
डोंगरकडा
9665711514