‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप शिवाजीपार्क येथील जाहीर सभेने काल पार पडला.रविवारी सकाळी ८.३० वाजता मणीभवन येथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या आठवणी जागवल्या.
त्यांच्या सोबत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी होते.आदल्या दिवशी मी,विशाल हिवाळे,फिरोज मिठीबोरवाला,गुड्डी,उल्का महाजन ,सीताराम आदी तुषार गांधी यांच्या सोबत मणी भवन येथे जावून आलो होतो.तेव्हा तिथल्या एका फोटोकडे तुषारभाई यांनी आमचे लक्ष वेधले होते.
दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गॅलरीमध्ये महात्मा गांधी,नेहरू,पटेल आदी नेत्यांचा एकत्रित फोटो तुषार भाई आम्हाला दाखवत होते. काल राहुल गांधी मणी भवनला आले असताना त्याच दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत राहुल आणि प्रियांका गांधी यांना ती गॅलरी दाखवायला तुषार भाई यांनी तिथं त्यांना आणलं होतं.त्या गॅलरीत राहुल उभे राहून खाली रस्त्यावर जमलेल्या सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करीत होते.
सामाजिक चळवळीत काम करणारे असंख्य कार्यकर्ते मणी भवन येथून ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने राहुल गांधी यांच्या सोबत चालू लागले.
यात पालघर येथील वाढवण विरोधात काम करणारे कार्यकर्ते,कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर काम करणारे राज असरोंडकर, केतन कदम,ओबीसींच्या प्रश्नावर काम करणारे संतोष आंबेकर,रायगड जिल्ह्यात कष्टकऱ्यासोबत काम करणाऱ्या उल्का महाजन, 22 प्रतिज्ञा अभियानाचे अरविंद सोनटक्के,जन आंदोलनाचे संजय मं.गो.हुसेन दलवाई, माजी आमदार विद्या चव्हाण योगेंद्र यादव,प्रतिभा शिंदे,विशाल हिवाळे,सीताराम शेलार ,लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे, शैला जाधव,मारुती भापकर , साधना शिंदे,निसार अली सय्यद, मेलवील गोन्सालवीस,मनिषा पाटील, फिरोज मिठीबोरवाला, अर्चना ताजणे, महादेव पाटील,अशोक शिंदे, केतन शहा, प्रा.प्रकाश सोनावणे, प्रमोद निगुडकर , वनिता तोंडवळकर, नुरीन पीटर्स,शमशाद तुर्की, सुमेध जाधव, किशोर केदार, रवींद्र निकाळे, दीपक सोनावणे, वॉल्टर डिसोझा, एम.ए.खालिद, सुहास कोते, ललिता सोनावणे, अली भोजने, कपिल अग्रवाल, जनार्दन जंगले, राजेश जाधव, घनश्याम अंबोरकर, नंदकिशोर तळाशिलकर,विजय परब,आदी असंख्य सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते होते.तरुण,आदिवासी,कष्टकरीआणि मुस्लिम महिला,युवकांची संख्या लक्षणीय होती.
ऑगस्ट क्रांती मैदानात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.जी.जी.पारीख यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले.क्रांती स्तंभाला अभिवादन करून राहुल आणि प्रियांका जवळच असलेल्या तेजपाल सभागृहात आले.
जन आंदोलनामध्ये सक्रीय असलेल्या महाराष्ट्रातील सामाजिक संस्था,संघटनेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी यांनी वेळ दिला होता.
लोकशाहीर संभाजी भगत यांनी त्यांच्या गाण्यातून या संवाद सभेची सुरुवात केली.योगेंद्र यादव यांनी या सभेचे प्रास्ताविक केले. कोल्हापूरहून आलेला राजवैभव शोभा रामचंद्र,संविधानाच्या प्रश्नावर काम करणारा विशाल हिवाळे,पुण्याहून आलेले मारुती भोपकर , सुनील मालवाकर, हसीना खान, मालू निरगुडे, हैद्राबादहून आलेले कांचा इलाह,उल्का महाजन यांनी जन आंदोलनाच्या प्रश्नांची मोजक्या शब्दात मांडणी केली.डॉ.संजय मंगला गोपाळ यांनी या सभेचे सूत्र संचालन केले तर गुड्डी हिने आभार मानले.
यंदाचे साने गुरुजी यांचे 125 वे जन्म शताब्दी वर्ष सुरू आहे.महाराष्ट्रात त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम सुरू आहे.11 जून पासून महाराष्ट्रातील सोळा जिल्हयातील 125 हून अधिक शाळांमधून सानेगुरूजी यांची गाणी,त्यांच्या गोष्टी कुमारवयीन मुलांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प कार्यकर्त्यानी केला आहे.
त्याचे औचित्य साधून सानेगुरुजी यांनी ‘खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे ‘असे सांगत प्रेमाचा संदेश दिला आहे.त्या गाण्यातील काही शब्द आणि गुरुजीची तसबीर आणि खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे असा संदेश आणि त्यावर सानेगुरुजी यांची प्रतिमा असलेला ‘ टी शर्ट ‘,सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या सहकाऱ्यांसह राहुल गांधी यांना भेट दिले.
संविधानाच्या प्रास्ताविकाची फ्रेम विशाल हिवाळे यांनी राहुल गांधी यांना भेट दिली.राहुल गांधीही कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई पर्यंत भारत जोडो यात्रा मध्ये प्रेमाचा संदेश देत आहेत.
सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी संबोधित करून सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी संवाद कायम राहील यांची ग्वाही दिली. आता इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील जिल्हा -जिल्हयातील नेते सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी संवाद वाढवतील अशी आशा बाळगूया…