शब्दांची गुंफण करुन आपले भावविश्व लेखनीतून रेखाटने म्हणजे काव्य.पण काव्यावर काव्य लिहिणे हेही एक विलक्षणीय म्हणावे लागेल. पारमिता षडंगी ह्या एक ओडिया साहित्य क्षेत्रातील मोठे नाव.त्यांच्या भाषेतील काव्य मराठी भाषेत अनुवादित करणे तशी तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. पण हे आव्हान रचनांनी स्वीकारले,आणि मराठी भाषेत या काव्य रचना न्याय पूर्ण केल्या. त्याबद्दल कवयित्री ‘रचनाचे’ अभिनंदन..
‘यज्ञ आणि इतर कविता’हे समर्पक शिर्षक देवून त्यांनी एकापेक्षा एक सरस एकूण पंचेचाळीस कविता वाचकांना दिल्या आहेत. यामध्ये दोन गोष्टी जाणवल्या त्या ह्या की काव्यसंग्रहाचे नाव ‘यज्ञ’. हे नाव आणि मुखपृष्ठ पाहून वाचक मनात गोंधळतो,पण संपूर्ण काव्य ग्रंथ वाचल्यानंतर त्याची समर्पकता लक्षात येते. तसेच रचना हे कवयित्रीचे नाव. इंग्रजीमध्ये शेक्सपिअर म्हणतो की,’नावात काय आहे?’हे कवयित्री यांच्या आषयपूर्ण कवितेती रचनांचा आणि रचनाचा संबंधित अर्थ समजतो.
रचना ही एक रचियेता म्हणून आपल्या समोर स्त्री रुपाच्या काव्यरुपी रचना सादर करत आहे. त्या सर्व रचना ‘यज्ञ आणि इतर कविता ‘या शिर्षकाखाली आपल्या काव्यबंध केल्या आहेत. वाचताना हा काव्य संग्रह स्त्रीवादी वाटतो.पण जसजसे एकेक कवितेचा आस्वाद घेवू, तेव्हा तो समग्र काव्याकडे वळताना जाणवतो. कारण यामध्ये कवयित्रीने विविध विषयांना हात घातलेला दिसून येतो. यात प्रथम माणूस, स्त्री पुरुष, शेतकरी,देश समाज,समानता एवढेच नाही तर तृतीय पंथीयांचे काव्यातून दर्शन होते. म्हणून तो समग्र वाटतो.
मुळात पुस्तकाचे मुखपृष्ठच आपणास खरी ओळख देवून जाते. चित्रकार सरदार यांनी या पुस्तकास आपल्या बोलक्या चित्रातून खरा न्याय दिला, असेच म्हणावे लागेल.
खरेतर, मुखपृष्ठावरील चित्र हे वाचकांची उत्सुकता वाढविते. विस्तृत समुद्राच्या पात्रातील एका शिंपल्याखाली एक असहाय्य स्त्री बसलेली दाखविलेली आहे. स्त्रीमनाचे दुःख, त्याग, निर्भरता, अत्याचार, तृष्णा आणि वास्तवतेच भावविश्व यातून विषद होते. तोच वाचक हे अनुभवून पुस्तकावर आगासीपणे तुटून पडतो. या पुस्तकास प्रस्तावना किंवा कवयित्रीचे मनोगत नाही. पण त्याची उनिव त्यामधील वाचणीय काव्यांनी भरुन काढलेली दिसून येते. साहित्याक्षर प्रकाशनाची ही आकर्षक आवृत्ती वाचकांना मोहून टाकते.सोबत मलपृष्ठ पारमिता षंडगी आणि अनुवादक कवयित्री रचना यांचा अभिमानास्पद परिचय करुन देते.
स्त्रीचे भावरुप व्यक्त करतांना स्त्री काय असते, याचा दाखला देतांना ‘कविता लिहायची होती’ कवितेत कवयित्री सांगते,
मला अस पाहू नकोस
माझे डोळे अगदी यशोदे सारखी आहेत
ज्या डोळ्यात बुद्ध ही खुजे ठरतात.
पुढे एका आईच काळीज सुपाएवढ असत.मायेच मायपण आणि दुःख झेलण्याची ताकद तिच्या मध्ये असते.एवढ सामावणार कुणी असेल, तर ती एक स्त्रीच होय.
‘भारताचे वीर’ या काव्यात ती व्यक्त होते,
छातीवर गोळी झेलली तेव्हा
नऊ महिन्याची गर्भवती पत्नी होते.
न मला दुःख होते,
न तिच्या डोळ्यात अश्रू..
गर्भात माझा मुलगा
सलामी देत होता.
काल ते पिता पुत्राला खांदा देत होते
डोळे अश्रूंनी भरलेले तरी
छप्पन इंच छाती फुललेली..
तर स्त्री जीवन सांगत ती जगाचाही विचार करते.आता जग बदलत आहे. माणूस माणसापासून दूर जात आहेत. तंत्रज्ञान आले आहे. माणसाच्या मुठीत विश्व आले आहे. पण माणसातला माणूस लोप पावत आहे.प्रेम, आपुलकी,जवळीकता संपत चालली आहे. म्हणून ‘एकाकी सायंकाळ मध्ये’ कवयित्री म्हणते,
हे कसलं जग आहे
जिथे प्रत्येकजण
अवाक आहे
सगळे मित्र गप्प आहेत
आकाशाच्या पलीकडे
कोणी देवता नाराज आहे का?
कवयित्रीचा व्यापक विचार समाजातील उनिव शोधीत जाते. मानवजातीतील एक वंचित घटक म्हणजे किन्नर (तृतीय पंथ)आज समाज त्यास उपेक्षित नजरेने बघतो.त्यास समाजात स्थान देत नाही. पण त्यांना ही भावना असतात. हे मनाशी जाणून घेतले पाहिजे. यावर ‘किन्नर’ मध्ये कवयित्री लिहिते,
ना मी नर
ना मी नारी
अर्ध नारीश्वर आहे मी
शिवाचा अवतार
मी निघालो आहे
एका अनोख्या यात्रेवर…
असे समाजातील विविध विषय वाचकांच्या मनाला सुन्न करतात. एवढेच नाही तर कधी कधी विचार करायला लावतात. काही काव्य दोनदा आल्याचा भास होतो, पण वाचल्यानंतर तो वेगळा आशय असल्याचे जानवते.
शेवटी ती मायाळू आणि या स्वार्थी जगात स्वतः च मीपण हरवून बसते. ‘आहूती’ मध्ये ती स्वतः ला शोधते.ती म्हणते,
एक रसरसता यज्ञ
अनुवत जगत आहे मी..
जसा
शब्दांनी भरलेल्या पानांत
एक अल्पसा विराम!.
काव्य ग्रंथातील क्रम चढता आहे. हा सर्व वयोगटातील वाचकांना रमून ठेवणारा काव्य संग्रह आहे. प्रत्येक काव्य मनाचा वेध घेणारे आहे.
कवयित्री रचना यांनी या संग्रहाबरोबर आणखी दोन पुस्तकाचे अनुवाद केल्याचे दिसून येते.आणि तोही ओडिया भाषेतील साहित्यातीलच,हे विशेष. त्यास पुरस्कार ही प्राप्त झालेले आहेत. हे अभिनंदनीयच आहे..
त्यांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझ्या लेखनीस विराम देतो.
**
बाबुराव पाईकराव
डोंगरकडा
९६६५७११५१४
यज्ञ आणि इतर कविता
(काव्यसंग्रह)
पारमिता षंडगी
अनुवाद,रचना,
साहित्याक्षर प्रकाशन
मूल्य :- २०० रुपये…