दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्री निर्मिती क्षेत्राचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’चे आयोजन दि .२४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर(मोशी) येथे करण्यात आले असून प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज २४ फेब्रुवारी रोजी दुपारी मोशी येथे झाले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, डॉ.बिपीन शर्मा, लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंग,एयर मार्शल विभास पांडे,’निबे लिमिटेड’ चे अध्यक्ष आणि प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे,सत्यनारायण नुवाल,जे डी पाटील ,आशिष सराफ,विनयकुमार चोबे,खासदार श्रीरंग बारणे,आमदार श्रीमती अश्विनी जगताप,आमदार महेश शिंदे ,किशोर धारिया,संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.डिफेन्स एमएसएमई क्षेत्रातील मॅक्स एरोस्पेस,निबे लिमिटेड या कंपन्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारशी निर्मितीसंदर्भात करार केले.
‘संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) च्या सहकार्याने महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.’निबे लिमिटेड’ ही कंपनी ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ ची नॉलेज पार्टनर आहे तर एल अँड टी,सोलर,टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स ,भारत फोर्ज लिमिटेड या कंपन्या स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत..एनएसइ,बीएसइ हे एक्स्चेंज पार्टनर आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’स्वराज्यासाठी संघर्षाचा संदेश शिवाजी महाराज यांनी दिला. पुणे हे सामरिक शक्तीसाठी महत्वाचे आहे. या एक्स्पोमुळे ते पुन्हा अधोरेखित झाले आहे. येथे संरक्षण सामग्री निर्मितीची चांगली परिसंस्था निर्माण झाली आहे.या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी आहे.अनेक संरक्षण विषयक संस्था राज्यात आहेत. गणेश निबे यांचा या क्षेत्रातील पुढाकार देखील कौतुकास्पद आहे. पहिल्याच दिवशी १ लाख नागरिक प्रदर्शनाला भेट आहेत,हे यश आहे.तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी सहकार्य केले.खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला हेही यश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ताकद ओळखली,स्वतःची संरक्षण सामग्री स्वतः देशात निर्माण करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे हा देश मजबूत देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.भारताला आता तंत्रज्ञान दिले जाऊ लागले आहे.लाखो कोटींची बचत होऊन रोजगार निर्मिती झाली आहे.३० टक्के दारुगोळा महाराष्ट्रात तयार होतो.२०१७ साली एअरोस्पेस,डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.हे धोरण आता नव्याने अद्ययावत केले जाणार आहे.एमएसएमई क्षेत्रानेही चांगले काम करून दाखवले.सप्लाय चेनवर भर देऊन चार डिफेन्स क्लस्टर तयार केले जाणार आहेत.मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल आणि रोजगार निर्मिती होणार आहे’.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,’राज्यात चार ठिकाणी डिफेन्स हब निर्माण करण्यात येणार आहे.या उद्योगांच्या मागणीनुसार १ हजार एकर जागा त्यांना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात आला आहे.या उद्योगांना प्राधान्य आणि इन्सेन्टिव्ह मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.डिफेन्स एमएसएमई क्षेत्रातील निबे लिमिटेड या कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकाराने हे महाप्रदर्शन प्रत्यक्षात आले आहे’.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,’नवीन शैक्षणिक धोरणानुसार थिअरी पेक्षा कार्यानुभवावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक जिल्ह्यातील उद्योगांची गरज भागेल असेच अभ्यासक्रम आम्ही निर्माण करीत आहोत.संरक्षण दलांसाठी लागणाऱ्या शिक्षित मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आम्ही धोरण आखले आहे.’
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रदर्शनाच्या पुढाकाराबद्दल महाराष्ट्राचे कौतुक केले. ‘आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे जगात भारत पुढे जात आहे.स्वदेशी निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे’,असेही त्यांनी सांगितले. डॉ.हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले.’निबे लिमिटेड’ चे अध्यक्ष आणि प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे यांनी आभार मानले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्रातील पहिलाच डिफेन्स एक्स्पो
संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून हे प्रदर्शन आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारे असेल,प्रेरणादायी ठरेल ‘असा विश्वास या प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर असलेल्या निबे लिमिटेड या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी व्यक्त केला.
भारतीय संरक्षण दलांसाठी उत्पादित केलेल्या शस्त्रात्रे,संरक्षण सामग्री यांचे स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत.विद्यार्थी,नागरिक यांना तेथे माहिती दिली जाईल. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने जल, स्थल आणि वायू या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्त्वाचा सहभाग आहे.
यात दोनशेहून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि २० हजारहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण-घेवाण करतील.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य असून शासनाच्या सहकार्याने डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात ‘निबे लिमिटेड ‘प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही गणेश निबे यांनी भाषणात दिली.