किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… — किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही :- उपमुख्यमंत्री अजित पवार… — किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

            किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

           मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्यभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद-सूर्य आहे तो पर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील. शिवराज्यभिषेक सोहळ्यात निमित्त राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार, चरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी करणे शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे. त्यामुळे रयतेने विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या कल्याणकरीता प्रयत्न करु, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

         छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

            मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

             कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ.अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला.