ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. १५: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नागपूर विभागस्तरावर व गडचिरोली जिल्हास्तरावर समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन सुरु होणार आहेत. १२वीसाठी समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन १४ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. तर १०वीसाठी २२ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता १२वीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर इयत्ता १० वीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. या परीक्षांसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक परीक्षा व परिक्षेसंबंधी गोपनीय माहिती वगळून अन्य माहिती मिळविण्याकरिता नागपूर विभागीय मंडळाद्वारे या दोन्ही परिक्षांच्या कालावधी दरम्यान विभागीय व जिल्हास्तरावर सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत ‘समुपदेशन केंद्र’ आणि ‘हेल्पलाईन’ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी विभागस्तरावर १२वीच्या परिक्षेसाठी संपर्क अधिकारी एस. एस. बुधे (मो.क्र. ९४०४३३९९९२), डी.बी.पाटील (मो.क्र. ७७०९१५७१७२), ए.बी. शेंडे (७०२०७३७४३४) आणि १०वीच्या परिक्षेकरिता संपर्क अधिकारी व्ही. आर. देशमुख (मो.क्र. ८८३०४५८१०९), पी.ए. कन्नमवार (९६७३१६३५२१) आणि एस.आर. अहीर (८३०८००७६१३) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. तसेच विभागीय मंडळ कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५५३५०७ आणि ०७१२-२५५३५०३ वरही माहिती प्राप्त करता येणार आहे.
तर जिल्हा स्तरावरील डी.एम. जवंजाळ (रेणुकाबाई उके हायस्कूल, शिवराजपूर, ता.देसाईगंज, जि. गडचिरोली मो.क्र. ९४२१८१७०८९) तसेच ए.एल. नुतिल कंठावार (लक्ष्मीबाई कन्या हायस्कूल, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली मो.क्र.९४२१७३२९५६) यांचेकडून माहिती प्राप्त करता येईल. तरी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवश्यकतेनुसार या समुपदेशन केंद्रांची व हेल्पलाईनची सुविधा घ्यावी, असे शिक्षण मंडळाकडून कळविण्यात आले आहे.