दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने गीता भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आळंदीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आले होते. यावेळी आळंदी दौऱ्यावर आले असताना त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, भैयाजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
‘भारताला उठावे लागेल कारण जगाला त्याची गरज आहे. कोणत्याही कारणाने भारत मजबूत झाला नाही किंवा उठू शकला नाही, तर जगाला लवकरच विनाशाला सामोरे जावे लागेल. अशी परिस्थिती कायम आहे. जगभरातील विचारवंतांना हे माहीत आहे. यावर ते बोलत आहेत आणि लिहित आहेत. भागवत पुढे म्हणाले, भारताला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी उठावे लागेल. यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचे आशिर्वाद व विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी व्यक्त केले.