राममंदिर प्राण प्रतिष्ठेपासून सौहार्दाचे नवे पर्व तयार व्हावे :- डॉ.पी.ए.इनामदार यांचे आवाहन… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राममंदिर -बाबरी मशीद विवादावर निर्णय दिल्यावर तो मानण्याची भूमिका देशातील अल्पसंख्य समुदायातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आणि अल्पसंख्य समुदायाने घेतली होती.

             त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर होत असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील श्री राम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचे आम्ही स्वागत करत असून इथून पुढे देशात शांतता आणि सौहार्दाचे नवे पर्व सुरु व्हावे’, असे आवाहन पुण्यातील आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांनी केले आहे. पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी राममंदिर मधील प्रतिष्ठापना सोहळ्या बद्दल भूमिका पत्रकाद्वारे मांडली आहे. 

            याबाबतची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले, ‘देशभरातील मुस्लिम समुदायातील सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि संस्था एकत्र येऊन राम मंदिर – बाबरी मशीद विवादासंबंधी जो निकाल सर्वोच्च न्यायालय देईल, तो मानू, अशी भूमिका तत्पूर्वी अनेक वर्षांपासून घेतलेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसारच राम मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला होता.

               त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणारी राम मंदिरातील श्री राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या घटनेचे आम्ही स्वागत करीत आहोत. या मंदिर उभारणीला आम्ही शुभेच्छा देत आहोत. हा विवाद जुना होता. शेकडो वर्षांपासून मनात असलेला किंतू आता दूर होईल आणि सर्व क्षेत्रात देशाची प्रगती होईल, येणाऱ्या पिढयांना या प्रगतीचा फायदा मिळेल’,असे डॉ.पी.ए.इनामदार यांनी या पत्रकात म्हटले आहे. 

            ‘जगाच्या पाठीवर आर्थिक,सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय ,सांस्कृतिक सर्व क्षेत्रात पुढारलेले राष्ट्र म्हणून भारत पुढे येईल,त्यासाठी आवश्यक शांतता ,सामंजस्य आणि सौहार्द कायम राहील ,यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.त्याचा एक भाग म्हणून २२ जानेवारीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याकडे पाहावे ‘,असेही डॉ.इनामदार यांनी या पत्रकात म्हटले आहे.