“मामासाहेब दांडेकर यांची ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ सात दशकांनी आधुनिक माध्यमात”….

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि स.प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर यांच्या ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचा सात दशकांनी जीर्णोद्धार करण्यात आला असून या ग्रंथाचे आधुनिक माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. क्यूआर कोडद्वारे जगभरातील अभ्यासकांना या ज्ञानेश्वरीचे केव्हाही वाचन करता येणार आहे. वारकरी संप्रदायात प्रमाणभूत मानल्या जाणाऱ्या या ज्ञानेश्वरीची प्रत शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.के.जैन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

              तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक आणि वारकरी संप्रदायाचे प्रणेते असलेल्या दांडेकर यांनी संपादित केलेल्या ‘सार्थ ज्ञानेश्वरी’चे १९५३ मध्ये प्रसाद प्रकाशनने प्रकाशन केले होते. ही प्रत स.प. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध होती. ही प्रत कालांतराने जीर्ण होऊन ग्रंथाची पाने सुटी होत गेली. मधल्या एका कालखंडात ही प्रत ग्रंथालयात दृष्टीआड झाली होती.

            त्यामुळे या ज्ञानेश्वरीचा जीर्णोद्धार करण्याची संकल्पना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ.किरण ठाकूर यांनी पूर्णत्वास नेली. एमआयटी स्कूल ऑफ डिझाईनचे संचालक डॉ.नचिकेत ठाकूर यांनी त्याची निर्मिती केली आहे. आधुनिक बाइंडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रतीचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ आवृत्तीतील रंगीत पाने सुरक्षित ठेवली आहेत.

            या ग्रंथाला लाकडी खोक्यामध्ये काचेच्या चौकटीत बंदिस्त ठेवले आहे. ही पेटी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दर्शनासाठी ठेवली आहे. तसेच वाचनासाठी स्वतंत्र प्रत उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरीच्या मूळ आवृत्तीची अर्काइव्हल लिंक नागपूर येथील अभ्यासक प्रा. डॉ. रमा गोळवलकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. https:// archive. org/ details/ in. gov. ignca.5728 ही लिंक क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध आहे.