‘मकरसंक्रांती’ च्या तोंडावर तीळ महागले; तिळाचे उत्पादन घटले.

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

             नविन वर्षातील पहीला सण म्हणजेच मकरसंक्रांती, या सणाची खास ओळख म्हणजे तिळाचे लाडू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत शेजारी पाजारी, कुटुंब, नातेवाईक यांना वाटण्यासाठी प्रत्येक घरात तिळाचे लाडू आवर्जून बनवले जातात.

           ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’, असे एकमेकांना शुभेच्छा देणारा मकर संक्रातीचा सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा सर्वत्र झालेल्या अल्प व नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तिळाचे उत्पादन घटले आहे.त्यामुळे तिळाचे भाव गगनाला भिडले आहेत. 

          मागिल काही वर्षांपासून सातत्याने तिळाचा पेरा कमी होत चालला आहे. १० वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात काही प्रमाणावर तिळाचा पेरा असायचा.

            जिल्ह्याचा एकट्याचा विचार केला, तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तिळाचे पीक आढळून येते. हा पेरा कमी होण्यामागचे ही काही कारणे आहेत.

           काही जाणकार शेतकऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी तिळ मोठ्या प्रमाणावर पिकविली जात होती. तेव्हा रासायनिक फवारण्याचा, औषधींचा वापर केला जात नव्हता.

            त्यामुळे उत्पादनही तशाच पद्धतीने निघायचे. हल्ली कीटनाशक व खराब बियाण्यांचा तिळ शेतीला फटका बसत आहे. कुणी तिळाचा पेरा केला, तर शेजारील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात तणनाशक औषधाची फवारणी केली, तर त्याचा परिणाम तिळाच्या शेतीवर होतो.

             वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेतकरी तिळ पिकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे भाववाढ होते. जिल्ह्यात उत्पादन कमी असल्यामुळे व्यापारी गुजरातमधून तीळ आणि तिळाचे पदार्थ मागवितात.

              गुजरातमध्ये तिळाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना तिळ लागवडीसाठी आवाहन केले जाते. मात्र, चांगल्या प्रमाणात उत्पादन निघत नसल्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

          ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येणाऱ्या काळामध्ये एक तिळ सात जणांना खाण्याची वेळ येणार का? तिळाचे पदार्थ आपल्या आहारातून हद्दपार होण्याच्या धोका आहे.

           तिळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचे वाढते दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचविणारे आहेत.

           सध्या प्रति किलो तिळा साठी साधारण १७० ते १८० रुपये गुळाकरीता ६० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत. 

          प्राप्त माहितीनुसार, भारतीय तिळ उत्पादन घटल्याने उपलब्ध खरेदी केलेला माल हा बाजारात लगेचच विकला जातो, याचेही प्रमाण अवघे १० ते १६ टक्के इतकेच आहे.अशातच थंडी मध्ये तिळाची वाढती मागणी पाहता अखेरीस आफ्रिकेतून तिळ आयात करण्याची वेळ आली आहे. किरकोळ बाजारात सध्या या तिळाची किंमत अधिक असून यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याचे पूर्ण संकेत आहेत.

           दरम्यान, काही वर्षांपूर्वी तिळ उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात हे चार तिळाचे उत्पादन घेणारे प्रांत आहेत. महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक, छत्तीसगढ येथे खरीप हंगामात तिळ घेतला जातो, तर तामिळनाडू राज्यात रब्बी हंगामात तिळ घेतला जातो. मात्र या सर्व ठिकाणी यंदा हवामानाचा फटका बसल्याने तिळाच्या उत्पादन व गुणवत्तेवर वाईट परिणाम झाला आहे.