सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली तालुक्यातील बहुतांश गावांत हागणदारीमुक्त गाव योजनेचा बट्टबाबोळ झाला आहे. केवळ पाठ थोपटून घेण्यापुरतेच प्रशासकीय यंत्रणेने या योजनेकडे लक्ष दिले. त्यामुळे आता तालुक्यातील बहुतांश गावांत परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने हागणदारीमुक्त गाव योजनेचा फज्जा उडाला आहे. शासनाने २ ऑक्टोबर २०१४ रोजी ग्रामीण भागात या अभियानाला सुरुवात केली होती. हागणदारीमुक्त गाव योजनेतील पुरस्कार प्राप्त गावांतही आता पूर्वीसारखीच परिस्थिती आहे.
हागणदारीमुक्त गाव योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशाला हागणदारीमुक्त बनविण्याचे होते. २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ग्रामीण भागातील कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. ग्रामसभेच्या माध्यमातून गावात हागणदारीमुक्त योजना प्रभावीपणे राबवून ग्रामस्वच्छतेचा परिपाठ गावागावात पोहोचविण्यात आला परंतु, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे हागणदारीमुक्त गावाकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा त्या गावांचा दर्जा खालावला आहे. गावातील प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा आहे. मात्र, त्याचा वापर होत नाही.
गावामध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठाउन कारवाई करण्यात येत होती तसेच कुटूंबप्रमुखाने शोचालयाचे बांधकाम न केल्यास त्याला ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या कोणत्याही सुविधा न देण्याचे नियमदेखील या योजनेत तयार करण्यात आले होते त्यामुळे अनेक गावे हागणदारीमुक्त झाली होती मात्र आता बहुतांश गावात शोचालये नसल्याने उघड्यावर जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात जनजागृतीची गरज
शासनातर्फे गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी नागरिकांना अनुदान देऊन शौचालय निर्मितीस प्रोत्साहन देण्यात आले नागरिकांनी शौचालये बांधली मात्र ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे आहे .