दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पूणे : वाघाळे (ता. शिरूर) येथील लहू बाळासो थोरात यांची शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.शिवाय, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात यांच्या अध्यक्षखाली सोसायटीची बैठक पार पडली. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ, आजी-माजी सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने घेतलेला ठराव व ग्रामस्थांनी एकमताने लहू थोरात यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार प्रतिनिधी पदी त्यांनी निवड झाल्याचे घोषीत करण्यात आल्यानंतर सत्कार करण्यात आला. दरम्यान, गावाने एकमताने निवड केल्याबद्दल लहू थोरात यांनी गावातील नागरिकांचे आभार मानले आहेत.
शिरूर तालुक्यात वाघाळे गावामधील राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गावामध्ये सत्ताधारी व विरोधी पार्टी असली तरी विकासाच्या मुद्द्यावरून संपूर्ण गाव एक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वाघाळे गावातील राजकारण लक्षात घेता सर्वानुमते लहूशेठ थोरात यांची एकमताने निवड झाल्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांनाही सुखद धक्का बसला आहे. वाघाळे गावाने एक आदर्श घालून दिल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.
वाघाळे गावातील नागरिकांनी राजकारण बाजूला ठेवत लहूशेठ थोरात यांची एकमताने निवड केली. वाघाळे गाव विकासासाठी एकवटल्याचे चित्र पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. भविष्यातही राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येणार आहोत,’ असे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, लहूशेठ थोरात यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे शहरात नावलौकिक मिळवला आहे. पुणे शहरात वास्तव्यास असले तरी गावची नाळ त्यांनी तोडलेली नाही. गावच्या विकासासाठी ते कायम आघाडीवर असतात. शिवाय, गावाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.