ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अवघी अलंकापुरी दुमदुमली…  — संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा भक्तिभावाने संपन्न.. 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सोमवारी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे चार लाख भाविक आळंदीत दाखल झाले होते. अलंकापुरीमध्ये माऊलींचा संजीवन समाधी सोहळा भक्तिभावाने रंगला. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून निघाली. गेल्या पाच दिवसांपासून वारकरी आळंदीत दाखल झाले. ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या गजरात अलंकापुरी न्हाऊन निघाली.

              संत नामदेव महाराज यांच्या वंशजाच्या वतीने सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत समाधी किर्तन सेवा संपन्न झाली सव्वा बाराच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पहाटे ३ वा प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पवमान अभिषेक करण्यात आला. सकाळी ७ ते ९ या वेळेत हभप हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन संपन्न झाले. सकाळी ७.३० ते ९.३० वीणा मंडप कीर्तन संपन्न झाले. भोजलिंग काका मंडप येथे ७ ते ९ कीर्तन संपन्न झाले. सकाळी ९ ते १० यावेळी महाद्वारात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर हभप हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षणा घातली. 

         माऊली मंदिरात वीणा मंडपात स.१० ते दु.१२ यावेळेत ह.भ.प. नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन संपन्न झाले. यानिमित्ताने मंदिरात सुंदर माऊलींची रांगोळी काढण्यात आली. माऊली मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. दुपारी बारा ते साडे बारा दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त घंटानाद त्यानंतर संजीवन समाधी वर पुष्पवृष्टी करण्यात आली व उपस्थित मानकरी व मान्यवरांना नारळ प्रसाद दिला, यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथजी, हभप भावार्थ देखणे, ॲड.विकास ढगे पाटील, ॲड.राजेंद्र उमाप, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, सेवेकरी, मानकरी, भाविक भक्त व आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.