राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे चंद्रभागा नदीपात्रात केले अर्ध दफन आंदोलन..  — महसूल विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे,घरकुल धारकांना मिळणार मोफत वाळू…

युवराज डोंगरे-खल्लार..

       उपसंपादक 

       दर्यापूर तालुक्यामध्ये मागील कित्येक वर्षांपासून वाळूचा लिलाव न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी वाळू उपलब्ध होत नव्हती.तर दुसरीकडे दररोज मध्यरात्री तालुक्यातील चंद्रभागा नदीपात्रासह विविध नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचे तस्करी केल्या जात आहे. 

           यासंदर्भात महसूल विभाग,पोलीस प्रशासनाला माहिती असून सुद्धा त्यावर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

           संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांनी तहसिलदार यांना लेखी स्वरुपात पत्र देऊन अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध व्हावी यासाठी निवेदन दिले होते.

               परंतु प्रशासनाने त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे अखेर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांनी महापरिनिर्वाण दिनी(दि ६डिसेंबर) चंद्रभागा नदीपात्रात सकाळी नऊ वाजता पासून अर्ध दफन आंदोलन सुरु केले.

          या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली होती.आंदोलन स्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी सुद्धा केली होती.जोपर्यंत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होत नाही व घरकुल लाभार्थ्यांना मोफत दरात वाळू मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असी ठाम भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांनी घेतली होती. 

            अखेर आंदोलन स्थळी खल्लार पोलीस व महसूल विभागाचे नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी हे दाखल झाले व त्यांनी आंदोलनकर्ते किरण होले यांच्या सर्व मागण्या ऐकून घेऊन वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व घरकुल लाभार्थ्यांना मोफत दरात वाळू उपलब्ध करण्यात येईल असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले.

         अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्ते किरण होले यांनी आपले अर्ध आंदोलन मागे घेतले. 

        यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश पावडे,शहराध्यक्ष रवी नवलकर,संतोष पुनसे,श्याम राऊत,तेजस राऊत,मंगेश भालेराव,रवि भालेराव,महेश ताबळे वेदांत तांबडे,सुभाष पाटील बुरघाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.