देहूकर ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाला आळंदीकरांचा पाठिंबा… — हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाचा आजचा चौथा दिवस… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

देहू : देहू गायरान जागा वाचविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २८) आमरण उपोषण सुरू केले. शुक्रवारी चौथ्या दिवशी उपोषण सुरू होते. सरकारी गायरानातील ५० एकर जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जागा देण्यासाठी देहतील नागरिकांचा विरोध केला आहे. सरकारने जागा देऊ नये यासाठी उपोषण करण्यात आले आहे. या उपोषणाला आळंदी येथील ग्रामस्थ व इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

          यावेळी आळंदीकर व इंद्रायणी सेवा फौंडेशनचे वतीने देण्यात आलेले पाठिंबा पत्र देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे यांच्या कडे सुपुर्द केले. यावेळी शिरीषकुमार कारेकर, जनार्दन पितळे (इनामदार), इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, अरुण बडगुजर, डॉ.सुनिल वाघमारे, माऊलींचे मानकरी दिनेश कुऱ्हाडे पाटील उपस्थित होते.

          देहूच्या दीडशे एकर गायरानापैकी ५० एकर गायरान हे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी देण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु आहेत. याला देहूकरांचा मोठा विरोध असून हे गायरान देहूतील नागरिकांच्या हक्काचे आहे. या गायरानाला वारकरी भवनासह इतर वास्तू उभारण्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावे, अशी मागणी देहूच्या विश्वस्तांनी केली आहे.

         जोपर्यंत राज्य सरकार आमच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या प्रवेश द्वारासमोरच ‘गायरान वाचवा…गाव वाचवा’ असे म्हणत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये देहु संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, नगराध्यक्ष पुजा दिवटे, तसेच गावातील दहा ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.