माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील : प्र.प्रांताधिकारी गोविंद शिंदे  — आळंदीत माऊली पालखी प्रस्थान सोहळा आढावा बैठक संपन्न….

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : आषाढी पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही प्र.प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. आषाढी पालखी सोहळ्यासाठी तिर्थक्षेत्र आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान दि.११ जून रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर पालखी प्रस्थान सोहळ्यासाठीच्या तयारीसाठी आढावा घेण्यासाठी प्र.प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

         यावेळी आळंदी नगरपरीषदेचे प्रशासक तथा तहसीलदार वैशाली वाघमारे,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,आळंदी देवस्थानचे विकास ढगे पाटील,पोलिस उपायुक्त प्रेरणा कट्टे,आळंदी पोलिस स्टेशनचे सुनील गोडसे,वाहतूक विभाचे शहाजी पवार,वैद्यकीय अधिकारी डॉ.उर्मिला शिंदे,ज्ञानेश्वर वीर,आळंदी ग्रामस्थांच्या वतीने डी.डी.भोसले,प्रशांत कुऱ्हाडे,सचिन गिलबिले,शंकरराव कुऱ्हाडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

          प्र.प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी बैठकीत प्रथम आळंदी संस्थान आणि विविध विभागांचे, ग्रामस्थांचे म्हणने ऐकून घेतले. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी सांगितले, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दरवर्षी भाविकांची संख्या वाढत जात आहे. मात्र या वाढत्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर आहे. त्या अनुषंगाने प्रशासन आणि नगरपरिषद यांनी तयारी सुरू केली आहे. पालखी सोहळा प्रस्थानसाठी पुरेसे वेळेत पाणी सोडले जाईल. त्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या जातील. पालखी प्रस्थान प्रदक्षिणा मार्गावर अतिक्रमण असणार नाही. इंद्रायणी नदीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी पाणी सोडण्यात येणार आहे. आळंदीला जोडले जाणारे सर्व रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी सूचना दिल्या जातील. आळंदी शहरातील अतिक्रमण हटविले जातील. रस्ते नीट केले जातील, असे सांगितले. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी मांडलेल्या मुद्यांबाबत सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.